फेटरीला १० लाखांचा पुरस्कार 10 lakh award to Fatari
नागपूर : आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेत नागपूर जवळील फेटरीने १० लाख रुपयांचा पुरस्कार पटकाविला आहे. अलीकडेच आयोजित समारंभात जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या हस्ते सरपंच धनश्री ढोमणे आणि ग्रामसेवक नितीन वाकोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
२०१४मध्ये मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आधीच्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या फेटरीला आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले होते.
राज्याची धुरा सांभाळताना आपल्या दत्तक गावाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून फेटरीच्या विकासाची जबाबदारी त्यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर सोपविली होती. फेटरी येथे आता जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, गुरांचा अत्याधुनिक दवाखाना, संगणकीकृत-वायफाय सुसज्ज ग्रामपंचायत, ग्रंथालय व वाचनालय, तीन डिजिटल अंगणवाड्या आहेत. गावात भूमिगत गडरलाइन व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, ग्रीन जीम सुविधांसह उद्यान, ३३ किलोवॉट क्षमतेचे विद्युत केंद्र, विविध फळझाडांचा समावेश असलेला बगिचा, लोकसहभागातून भव्य विठ्ठल मंदिराची उभारणी, वॉटर एटीएम, जलशुद्धीकरण केंद्र, कचरा संकलन वाहने व आयएसओ प्रमाणित माता-बाल संगोपन केंद्र आदींची निर्मितीसुद्धा झाली आहे.
या विकासकार्यामुळेच सुंदर गाव पुरस्कार योजनेतंर्गत तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत फेटरी अव्वल ठरले. पुरस्कार वितरण समारंभाला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, शिक्षण सभापती भारती पाटील, सदस्य शांता कुमरे, समीर उमप, कळमेश्वर पं.स.चे सभापती श्रावण भिंगारे उपस्थित होते. फेटरीला हा पुरस्कार मिळण्याचे श्रेय अमृता फडणवीस यांच्यासोबत सरपंच धनश्री ढोमणे, उपसरपंच आशीष गणोरकर, ग्रा.पं. सदस्य व गावकरी यांना आहे.