जिल्ह्यात दररोज २00 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार

Share This News

नागपूर
जिल्ह्य़ातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे वाढते प्रमाण दिलासादायक आहे. ऑक्सिजन व बेडच्या मागणीत किंचित घट झाली असली तरी कोरोनाचे सध्याचे संकट पाहता जिल्ह्य़ात दररोज २00 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. या ऑक्सिजनचे योग्य वितरण करण्याचे आदेश केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी ना. गडकरी यांनी बैठक घेतली. या बैठकीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत ऑनलाईन सहभागी झाले होते. बैठकीत ऑक्सिजन पुरवठा, सिलेंडर खरेदी ऑक्सिजन प्लांट पाईपलाईन, रेमडेसिवीच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. आमदार आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह वाहतूकदार संघटनेचे प्यारेखान उपस्थित होते.
सध्या जिल्ह्य़ात उत्पादित ऑक्सिजन व्यतिरिक्त १४0 मेट्रिक टन ऑक्सिजन भिलाईतून येत आहे. त्यामुळे १६0 मेट्रिक टनाच्या जवळपास ऑक्सिजन रोज उपलब्ध होत आहे. जिल्ह्य़ाची गरज १६0 मेट्रिक टन असली तरी २00 मेट्रिक टन इतक्या मूबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असल्यास शासकीय व खासगी रुग्णालयांची गरज चांगल्या पद्धतीने भागवता येईल. सर्व रुग्णालयांच्या मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठा करता येईल. पुरवठा झाल्यावर संबंधित वाहतूकदारांचे देयक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तत्काळ अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले. तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने अल्पमुदतीच्या उपाययोजनांचा हा भाग आहे. ही तात्पुरती उपाययोजना झाली आहे. मात्र, दीर्घकालीन उपाययोजनांत ऑक्सिजन प्लांट उभारणी हेच लक्ष्य असल्याचे गडकरी यांनी सांगितले. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची तांत्रिक मदत करण्याबाबत त्यांनी यावेळी आश्‍वस्त केले. २४ तासांत जिल्ह्य़ात वाहतुकीसह २00 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वाहतूक, ड्रायव्हर, ट्रकच्या फेर्‍या, देखभाल दुरुस्तीसह सर्व नियोजन व जबाबदारी प्यारेखान यांना देण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार्‍या जुबिली, अमोघा ऑक्सी, आसी या उत्पादकांशी यावेळी चर्चा करून गडकरी यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली. गुरुवारी ४00 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशिन व ३00 व्हेंटिलेटर प्राप्त होत असून, चामोर्शी, एटापल्ली, सिरोंचा व अन्य तालुक्यातील शासकीय रुग्णालयांना पाठविणार असल्याचे तसेच ९ रुग्णवाहिका शासकीय यंत्रणेला देणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
मेयो, मेडिकलमध्ये
प्रतीक्षालय डोम उभारा
मेडिकल-मेयोमध्ये रुग्ण नातेवाईकांना बसण्याकरिता तसेच वेळप्रसंगी रुग्णांना प्रतीक्षालय म्हणून डोमची उभारणी तातडीने करावी. वर्धा येथील रेमडेसिवीर उत्पादक कंपनीद्वारे निर्मित ३0 हजार इंजेक्शनचा पहिला साठा १0 मेपासून येईल. त्यामुळे रुग्णांना ते मूबलक व सहजरित्या उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर व अमरावती विभागनिहाय वितरण व समन्वयन संबंधित विभागीय आयुक्त करतील, असे सांगण्यात आले.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.