
खासदार सुळेंविरुद्ध वापरलेल्या अपशब्दांचा निषेध
यवतमाळ. कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना अश्लील शिवीगाळ करून अपशब्द वापरले व त्यांचा अनादर करून अब्रूचे नुकसान केले. त्यामुळे कृषिमंत्र्याविरुद्ध भारतीय दंड विधिनियम २९४ व ५०९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य लीगल सेलचे अध्यक्ष ॲड. आशिष देशमुख यांनी पुसद (Pusad) शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. ॲड. आशिष देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या संदर्भात काल सोमवारी दुपारी १२.५९ वाजता एका वृत्त वाहिनीवर बातम्या पाहात असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत अश्लील शिवीगाळ करून ‘भिकारचोट’ असा अपशब्द वापरून त्यांच्या अब्रूचे नुकसान केले आहे. ही बाब एका महिलेकरिता अतिशय लाजिरवाणी असून सुप्रिया सुळे या आमच्या महिला नेत्या असल्यामुळे त्यांचा जाणीवपूर्वक उल्लेख कृषिमंत्र्यांनी करून संपूर्ण स्त्री जातीचा अपमान केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे या अतिशय विनम्र व अभ्यासू महिला नेत्या आहेत. देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या त्या सदस्य आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्रात स्वतःचे उंच असे स्थान निर्माण केले आहे. गैरअर्जदाराच्या उपरोक्त कृत्यामुळे त्यांचा अपमान होऊन अनादर झालेला आहे. ही बाब आमच्यासारख्या महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांचे मन हेलावून टाकणारी आहे. त्यामुळे याबाबत गांभीर्याने दखल घेवून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे. असा तक्रार अर्ज पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेला आहे.
आपल्या तक्रारीवर कारवाई करण्याची मागणी ॲड. देशमुख यांनी केली आहे. पोलिसांशी संपर्क साधला असता चौकशी सुरू असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी सांगितले. अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर नारे, निदर्शने, होम हवन करण्यात येत आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे.
नागपुरात होमहवन
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. आज सकाळी नागपूरच्या हिवरीनगरात सत्तारांना सद्बुद्धी मिळण्याची प्रार्थना करीत होमहवन करण्यात आले. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी रेड्याच्या शरीराला सत्तारांचा चहरा लावलेले बॅनर घेऊन कार्यकर्त्यांनी लक्ष वेधून घेतले.
184 total views, 3 views today