
अधिवेशनकाळात पक्षप्रवेशाची शक्यता : युवा सेनेचे आठ पदाधिकाऱ्यांनाही खुणावतेय बाळासोबांची शिवसेना
नागपूर. काँग्रेसचे (Congress) चार माजी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या सोबतीने आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेचे आठ जिल्हाप्रमुखही बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाण्यासाठी इच्छुक आहेत. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विदर्भात असून गोसेखुर्द प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. याच दरम्यान ते पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांची चाचपणी करणार आहेत. युवासेना पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यास काही कारणाने विलंब झाला. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठोपाठ विदर्भातील (Vidarbha) आठ जिल्हाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात येतील. त्यांच्यासह माजी आमदारांचा प्रवेश सोहळा, हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत होईल अशा प्रकारचे नियोजन करण्यात येत असल्याचे कळते.
काँग्रेसचे चार माजी आमदारही आमच्या संपर्कात आहेत. तेही याच दरम्यान प्रवेश करतील, अशी माहिती खासगार कृपाल तुमाने यांनी दिली. जिल्हाप्रमुख अथवा माजी आमदारांची नावे मात्र त्यांनी गुपित ठेवली असली तरी चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथील माजी आमदार शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांचे बंड जेव्हा व्हायचे होते आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकसंघ होती, तेव्हाही शिवसेनेचे फार प्राबल्य येथे नव्हते. नागपूर महानगरपालिकेत त्यांचे फक्त दोन नगरसेवक होते. त्यातही शिवसैनिकांमधील गटबाजीचीच चर्चा अधिक होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले होते. आता एकनाथ शिंदे यांनी अर्ध्यापेक्षा जास्त शिवसेना फोडली आणि स्वतःचा बाळासाहेबांची शिवसेना हा गट घेऊन ते काम करत आहेत. शिवसेनेने कधी नव्हे, येवढे लक्ष ते विदर्भात घालत आहे. त्यांना तसा प्रतिसादही मिळतोय. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाने इकडे लक्ष देण्याची गरज आहे. पण अद्यापतरी तसे ठोस काम उद्धव सेनेकडून येथे झालेले नाही. संजय राऊत यांच्यावर जेव्हा नागपूरची जबाबदारी सोपवली होती. तेव्हा त्यांनी येथील शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण केला होता. पण त्यांना अटक झाल्यानंतर स्थिती पुन्हा जैसे थे झाली. आता अधिवेशनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे पुन्हा उद्धव सेनेला खिंडार पाडणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून काय हालचाली होतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

190 total views, 3 views today