
पाटणाः किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेले राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक लालूप्रसाद यादव यांना किडनी प्रत्यारोपण करावे लागणार आहे. लालूप्रसाद यादव यांना त्यांच्या मुलीने किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे (Lalu`s daughter to donate her kidney to him) सिंगापूरमध्ये राहणारी लालूंची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य ही आपल्या वडीलांना किडनी देणार आहे. यादव यांच्यावरील किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया सिंगापूरमध्ये होणार आहे. यासाठी सिंगापूरमधील डॉक्टारांनी मान्यता दिली असून किडनी प्रत्यारोपणाची सर्व तयारीही करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. वडिलांची प्रकृती खालावल्यानंतर रोहिणीने आपल्या कुटुंबाला त्यांच्यावर सिंगापुरमध्ये उपचार करण्याचा आग्रह केला होता. लालू प्रसाद यांना किडनी, मधुमेह, हृदयासोबतच अनेक आजार आहेत.
लालू प्रसाद यादव यांच्यावर दिल्ली एम्सच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. एम्सच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच लालूप्रसाद यांना उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले होते. तपासणीनंतर सिंगापूरच्या डॉक्टरांनी लालूंना किडनी प्रत्यारोपणाची परवानगी दिली आहे. रोहिणी आचार्य सिंगापूरमध्ये राहतात. उपचारासाठी लालूप्रसाद गेल्या महिन्यात सिंगापूरला गेले होते. या महिन्यात लालू पुन्हा सिंगापूरला जाऊन किडनी प्रत्यारोपण करू शकतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला लालूप्रसाद यादव हे मुलीची किडनी घेण्यास अजिबात तयार झाले नव्हते. मात्र शेवटी त्यांच्या मुलीनेच त्यांची समजूत काढली. त्यामुळे आता ते तयार झाले असल्याची माहिती आहे. तज्ज्ञांच्या मते कुटुंबातील सदस्याची किडनी उपलब्ध झाल्यास प्रत्यारोप यशस्वीतेचे प्रमाण अधिक असते. सिंगापुरमधील सेंटर फॉर किडनी डिसीस येथे लालूप्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

190 total views, 3 views today