
सातारा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज साताऱ्यात होते. साताऱ्यात बोलताना बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच शरद पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला असून त्यामुळेच ते त्यांच्यासोबत असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने एक प्रकारचा जादूटोणा केला. त्यात उद्धव ठाकरे अडकले. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आता सतर्क असून सरकार पुन्हा निवडून आणू असेही बावनकुळे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात 200 हून आमदार निवडून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी शरद पवार यांचा उल्लेख भोंदूबाबा असा केल्याचा आरोप होत असून त्यावर राजकीय टिकाटिप्पणी सुरु आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता सत्तेचे स्वप्न सोडून द्यावे. त्यांना आपण अजूनही सत्तेत येऊ असे, वाटत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बेईमानी करून सत्ता स्थापन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, असे बावनकुळे म्हणाले. या पक्षातील भोंदूबाबाच्या ताब्यात कोणी आले तर तो सुटत नाही, वक्तव्य करताना भोंदूबाबा कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे व पुन्हा ते सांगण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, बावनकुळे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शरद पवारांबद्दल असे वक्तव्य केले असेल तर त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. एकाबाजूला कटुता संपवूया द्वेष संपवूया, असे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला द्वेषमूलक वक्तव्य करायची ही भाजपची जुनी खोड असल्याचे ते म्हणाले.

186 total views, 3 views today