
मुंबईः टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडकडून लाजीरवाण्या (T20 World Cup ) पराभवानंतर आगामी काळात भारतीय संघात मोठे बदल होतील, असे संकेत मिळत आहेत. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर चौफेर टीका होत आहे. भारतीय क्रिकेट संघ न लढताच पराभूत झाल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यामुळे आता आगामी काळात संघात मोठे बदल होतील, असे संकेत बीसीसीआयकडून (BCCI) मिळत आहेत. विशेष म्हणजे लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनीही आता भारतीय संघाचे नेतृत्व हार्दीक पांड्याकडे येऊ शकते, असे मत सोशल मिडियावर जाहीरकेले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यासारख्या खेळाडूंना टी-२० संघामधून वगळण्यात येऊ शकते, असे मतही काही माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीच टी-२० मधील त्यांच्या भविष्यातील वाटचालीबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा, अशी बीसीसीआयची इच्छा असल्याचे समजते. पुढच्या वर्षी एक दिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा आहे. यापुढे अनुभवी खेळाडूंचा विचार एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यांसाठी केला जाईल, असे धोरण बीसीसीआयकडून निश्चित होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.
एकीकडे बीसीसीआयने नव्या संघासंदर्भातील तयारी सुरु केली असतानाच दुसरीकडे राहुल द्रवीडने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये विराट आणि रोहित सारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या भवितव्याबद्दल अत्ताच भाष्य करणं घाईचे ठरेल, असे नमूद केले आहे. भारतीय संघाचे वेळापत्रक पाहिल्यास आता भारत केवळ दोन देशांच्या संघांमध्येच होणाऱ्या टी-२० मालिका खेळणार आहे. पुढील आठवड्यात न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेस सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये रोहित, कोहलीला विश्रांती देण्यात आली असून शुभमन गीलचा समावेश करण्यात आला आहे. उपकर्णधार असलेला ऋषभ पंत सुद्धा एक उत्तम सलामीवीर असल्याने तो या मालिकेत नव्या भूमिकेत दिसू शकतो. पृथ्वी शॉ सारख्या खेळाडूलाही संधी मिळू शकते.

173 total views, 6 views today