
आत्महत्या केल्याचा रचला बनाव : धाकट्या मुलीच्या डोळ्यादेखत थोरलीचा खून
नागपूर. एका माथेफिरूने दुसरी पत्नी आणि सासरच्यांना खोट्या गुन्ह्यात अककवून धडा शिकविण्यासाठी आपल्याच मुलीचा बळी (Murder daughter)घेतला. तिने आत्महत्या केल्याचा (Attempt to commit suicide) बनाव करून सासरच्यांना त्यात गोवण्यात तो जवळपास यशस्वीही झाला होता, मात्र काही फोटो पोलिसांच्या (Police) हाती लागले आणि खुनाचा उलगडा झाला. ही खळबळजनक घटना कळमना पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. आरोपी बापाने मुलींना विश्वासात घेतले. निव्वळ नाटक म्हणून मृत मुलिकडून त्याने आत्महत्या करीत असल्याचे पत्र लिहून घेतले. थोरलीला संपूर्ण घटनाक्रमाचे फोटोही काढायला लावले. त्यानंतर धाकट्या मुलीच्या डोळ्या देखतच थोरल्या मुलीची हत्या केली. प्रकरणाचा उलगडा होतपर्यंत पोलिसांनी हे प्रकरण दाबून ठेवले आणि जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेतली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी गुड्डू छोटूलाल रजक (40) रा. कळमना गाव याला अटक केली आहे.
गुड्डूची पहिली पत्नी आरती हिने कौटुंबिक कलहातून 2016 मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली हेाती. पहिल्या पत्नीपासून त्याला माही (16) आणि खुशी (12) नावाच्या मुली आहेत. पत्नीच्या मृत्यूनंतर 2018 मध्ये गुड्डूचे संबंध कौशल्या पिपरडे नावाच्या महिलेशी जुळले. दोघेही पती-पत्नी सारखे राहू लागले. मात्र गुड्डूच्या विक्षिप्त स्वभावामुळे कौशल्याही काही दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेली. कौशल्याला वडील, भाऊ आणि वहिनीकडून मदत मिळत होती. गुड्डूने कौशल्या आणि तिच्या कुटुंबाला धडा शिकविण्याची योजना बनवली. जवळपास 20 ते 25 दिवसांपूर्वी माहीने विष प्राशन केले होते. तिची मावशी तिला बघायला रुग्णालयात गेली होती. त्यावेळी माहीने सावत्र आई आणि तिच्या कुटुंबीयांमुळे विष प्राशन केल्याचे सांगितले होते. 6 नोव्हेंबरला पहाटे माहीने गळफास लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. पोलिसांना तिच्याजवळ 5 सुसाईड नोट मिळाले. त्यात तिने सावत्र आई, मामा आणि मामीकडून होणारा छड आणि शारीरिक शोषणाचा उल्लेख केला होता. पोलिसांनी तिघांवरही विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
फोटोंनी उलगडले रहस्य
या घटनेबाबत सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांना गुड्डूचे हावभावही विचित्रच वाटत होते. त्याचा अॅन्ड्रॉईड फोन तपासला असता काही फोटो डीलिट करण्यात आल्याचे समजले. तांत्रिक माध्यमातून डाटा पुनर्प्राप्त केला असता काही फोटो सापडले. त्यात माही फास गळ्यात टाकताना, जीभ बाहेर काढताना दिसत आहे. एका फोटो स्वत: गुड्डूही दिसत आहे. फासाची दोरी सैल होती. अखेर पोलिसांनी गुड्डूला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला तो सर्व दोष दुसरी पत्नी आणि सासरच्यांवरच टाकत होता. मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने माहीचा खून केल्याचे कबूल केले.
दोन्ही मुलींना योजनेत केले होते सामील
गुड्डूने माही आणि लहान मुलगी खुशीला कौशल्या आणि तिच्या कुटुंबाला धडा शिकविण्याच्या योजनेत सामील केले होते. त्याने त्यांना केवळ गळफास लावल्याचा बनाव करायचा आहे. फोटो काढून त्यांच्या कुटुंबाला अडकवू, असे सांगितले होते. त्याने सांगितल्यानुसारच माहीने सुसाईड नोट लिहिले होते. गुड्डूने स्वत: फास तयार केला होता. लहान मुलीला मोबाईलवर फोटो काढण्यास सांगितले. माहीने प्लॅस्टिकच्या स्टूलवर चढून गळ्यात तो फास टाकला. काही फोटो काढल्यानंतर गुड्डूने स्टूलला लात मारून खाली पाडले. माहीला गळफास लागला आणि तिचा मृत्यू झाला.
योजनेत जवळपास झालाच होता यशस्वी
लहान मुलीच्या डोळ्यासमोर ही पूर्ण घटना घडली होती. पोलिसांनी नातेवाईकांच्या माध्यमातूनही तिची विचारपूस केली. यात त्यांना यश मिळाले आणि मुलाने वडिलांच्या संपूर्ण योजनेचा उलगडा केला. आता गुड्डूवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र एकवेळी गुड्डू आपल्या योजनेत पूर्णत: यशस्वीही झाला होता. त्याने केलेल्या बनावावर विश्वास ठेवून पोलिसांनी सावत्र आई आणि तिच्या कुटुंबाला आत्महत्येसाठी बाध्य करणे आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात आरोपी केले होते. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
490 total views, 3 views today