
मुंबई. तीन महिन्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तुरुंगातून बाहेर आले आहेत. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: शिंदे गटावर (Shinde group) टीकास्र सोडलं आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar ) यांचे पुत्र अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून आज सकाळी त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लक्ष्य केलं. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांशी शक्यताही व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे राजकारण इतके अस्थिर झाले आहे, की उद्धव ठाकरे सांगतायत ते खरे आहे. मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. जे म्हणतात अमुक-तमुक आमच्यासोबत आहेत, त्यांच्यातच फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटिरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो, असे ते म्हणाले.
गजानन किर्तीकर सोडून गेल्याचे दु:ख अधिक असल्याचे सांगतानाच किर्तीकरांचा मुलगा अमोल किर्तीकर कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबतच आहेत. गजानन किर्तीकरांनी घेतलेल्या निर्णयात ते सहभागी नाहीत.त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. १०० दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला अमोल आमच्यासोबत राहिल्याचा झाला आहे. अशाच कडवट लोकांसोबत शिवसेनेचा प्रवास पुढे जाणार आहे. आम्हाला अनेक लोक सोडून गेले. पण गजानन किर्तीकर सोडून गेल्याचे दु:ख आम्हाला जास्त आहे, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जात असल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सत्ताधारी आणि विरोधकांनाही सल्ला दिला. महाराष्ट्रातून प्रकल्प जात आहेत. यावर कुणीच काही बोलत नाही. एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा हे प्रकल्प का जात आहेत? यावर महाराष्ट्र म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून निर्णय घेणे गरजेचे आहे. राजकीय शत्रुत्व जपण्यासाठी उभा जन्म पडला आहे. पण महाराष्ट्र कमजोर झाला, तर आपण राजकारण करायलाही उरणार नाही याचे भान सत्ताधारी आणि विरोधकांनीही ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले.
189 total views, 3 views today