
नेमका परिस्थिती जाणून घेणार : बुधवारी पातूर येथे चर्चा
अकोला. भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सोमवारी विदर्भात (Vidharbha) दाखल होत आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे वास्तव या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर खुद्द आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी (Widowed wives of farmers) मांडणार आहेत. महिला किसान मंचच्या पुढाकारातून अकोल्यात या शेतकरी महिला राहुल गांधी यांच्याशी संवाद साधणार आहेत. भारत जोडो यात्रा सोमवारी वाशीम जिल्ह्यात प्रवेश करत असून, बुधवारी संध्याकाळी अकोल्यातील पातूर येथे यात्रेचा मुक्काम असेल. विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये अकोल्याचाही समावेश असून, याच भूमीत आत्महत्यांमागील वास्तव तसेच घरातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर या महिलांनी सावरलेली शेती व संसार याची कथा अन् व्यथा शेतकरी महिला व्यक्त करणार आहेत.
महिला किसान मंचच्या सीमा कुलकर्णी यांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांचे संघटन उभे राहिले आहे. या महिलांनी पतीच्या निधनानंतर शेती सोडून न देता शेती कर्जमुक्तही केली व संसारही सावरला आहे त्यामागील संघर्ष राहुल गांधी जाणून घेणार आहेत.
लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांना पारंपरिक ३८ प्रकारच्या बियाण्यांची भेट दिली जाणार आहे. आपल्या मातीला समृद्ध करणारा ठेवा यानिमित्ताने अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी दिली.
शेगावची सभा देशात परिवर्तन घडवेल – काँग्रेस
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता लोकांची यात्रा झाली आहे. लोक स्वयंस्फूर्तपणे यात्रेत सहभागी होत आहेत. जनतेचा वाढत चाललेला पाठिंबा पाहता शेगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जाहीर सभेत आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडणारी गर्दी होईल. तसेच ही सभा राज्यातच नव्हे, तर देशात परिवर्तन घडवेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार भास्करराव खतगावकर, माध्यम विभागाच्या महिमा सिंह, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.
197 total views, 3 views today