
अकोला: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या विदर्भात आहे. अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. भाजपचे नेते शेतकऱ्यांवर काहीच बोलत नाहीत, असे सांगत आमची यात्रा रोखून दाखवा, असे आव्हानही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यावेळी दिले आहे. सध्या देशात अनेक प्रश्न आहेत. जनतेच्या प्रश्नावर आम्हाला संसदेत बोलू दिले नाही. देशात महागाई आहे, रोजगार नाहीत. शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचे गांधी यावेळी म्हणाले. जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. सध्या राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्यावरून गदारोळ माजला असतानाच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे.
खासदार राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रेतून देशाचे नुकसान होत असेल तर त्यांनी ही यात्रा रोखावी. सध्या देशापुढे दोन मोठ्या समस्या आहेत. देशातच युवकांना रोजगार मिळत नाही. दुसरे म्हणजे सध्या शेतकऱ्यांना कोणताच दिलासा मिळत नाही. शेतकरी वेळेला पीक विमा भरतात मात्र, त्यांना पैसे मिळत नाहीत. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.
यात्रा रोखून दाखवा असे आव्हानही राहुल गांधी यांनी दिले आहे. आम्ही यात्रा पूर्ण करू, असेही राहुल गांधी यावेळी म्हणालेत. भारत जोडो यात्रा विचारांची आहे. जनतेचे लक्ष्य विचलित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.

233 total views, 3 views today