
इंदूर: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देणारे (Bomb Threat for Rahul Gandhi) एक पत्र मध्य प्रदेशातील इंदुरमधील एका मिठाई दुकानात पाठविण्यात आले आहे. त्यात राहुल गांधी यांना बॉम्बने उडवू, असा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी या पत्राची चौकशी सुरु केली असून प्राथमिक चौकशीत हे पत्र कोणीतरी खोडसाळपणे पाठविले असल्याचे दिसते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेकडून या पत्राची चौकशी सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून धमकीचे पत्र पाठविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
राहुल गांधी सध्या महाराष्ट्रात असून २४ नोव्हेंबरला इंदोरमध्ये असणार आहेत. खालसा स्टेडिअममध्ये ते रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहेत. दरम्यान पोलिसांनी हा खोडसाळ प्रकार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पण तरीही पोलीस सर्व काळजी घेत असून तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धमकी देणारे हे पत्र शुक्रवारी सकाळी एका मिठाईच्या दुकानाबाहेर अज्ञात व्यक्ती सोडून गेली. चिठ्ठीत म्हटले आहे की, भारत जोडो यात्रा इंदुरमध्ये पोहोचल्यावर राहुल गांधी यांना बॉम्बने उडवण्यात येईल. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम ५०७ नुसार गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. चिठ्ठी मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरूवात केली.राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वा. सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून जोरदार वाद सुरू आहे.
143 total views, 3 views today