
नागपूर: संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र प्रणित उद्योजक संघ, शाखा नागपूरचा वार्षिकोत्सव सन्मान लाॅन, बजाजनगर,येथे झाला.
कार्यक्रमास शिवश्री सुधांशू मोहोड अध्यक्षस्थानी तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र जिचकार उद्घाटक, होते. इंजि. संजय काळे प्रमुख वक्ता मार्गदर्शक आणि प्रदेश उपाध्यक्ष रमेश हांडे केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते,कलावंत यांचा सत्कार करण्यात आला. यात डॉ पल्लवी देशमुख, तेजस गाडगे, अभीविलास नखाते, विजय ठाकरे, बलराज लोहे, अमित ठाणेकर, इंजिनीयर गुणवंत मुडे, गड किल्ले अभ्यासक मंदार व अर्णव उट्टलवार, प्रशांत ठाकरे आदी मान्यवरांना स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी इंजिनियर काळे म्हणाले नव्या संधी, आव्हानांसाठी आपल्याला तयार व्हावे लागेल. यासाठी व्यक्ती निर्माण महत्त्वाचे असून कौशल्य वाढविण्याची गरज आहे हे असेल तरच आपली उन्नती होईल. जीवनात आदर्श ठरवा, खूप परिश्रम करा अशा अनेक टिप्स देत त्यांनी यशस्वीतेचा मार्ग सांगितला. उद्घाटक म्हणून बोलताना नरेंद्र जिचकार यांनी जिद्द असेल तरच कुठलाही क्षेत्रात यश मिळवणे अवघड नाही असे सांगितले. प्रदेश उपाध्यक्ष रमेश हांडे यांनी 28 डिसेंबरला संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधांशू मोहोड यांनी उद्योजकतेचे बीज रोवण्याचा मूलमंत्र दिला. कुठलीही पार्श्वभूमी नसताना यशोशिखर गाठणाऱ्याचा आपण आज सन्मान केला असे स्पष्ट केले.
यावेळी संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्षपदी डाॅ. किरण भुयार, महानगर अध्यक्ष म्हणून इंजि. कौशिक देशमुख तर महानगर उद्योजक संघ अध्यक्षपदी इंजि. गणेश खडसे यांची नियुक्ती करण्यात आली.
महिला उद्योजक संघाची यानिमित्ताने सुरूवात झाली. सौ. वनमाला राऊत, अध्यक्षपदी, प्रा. जयश्री काळे, सचिवपदी तर सौ. प्रगति मोहोड उपाध्यक्षपदी विराजमान झाल्या.संचालन गणेश खडसे तर प्रास्ताविक डाॅ किरण भुयार व आभार प्रदर्शन शिवराज लोहे यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात जिजाऊ वंदनेने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.



250 total views, 3 views today