
बुलढाणा : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर आता ठाकरे गटातील आणखी तीन खासदार व आठ आमदार शिंदे गटात ( ‘बाळासाहेबांची शिवसेना’) पक्षात (3 Mps and 8 MLA
s to join Shinde Camp) दाखल होतील, असा दावा बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. निवडणुका जवळ आल्यावर तीन खासदार व आठ आमदार शंभर टक्के शिंदे गटात दाखल होतील, असे त्यांनी सांगितले. नेतृत्वावरील प्रेमामुळे ते सध्या तिकडे थांबलेले असले तरी निवडणुका जाहीर होताच ठाकरे गट रिकामा झालेला असेल, असा दावाही जाधवांनी केलाय. अलिकडेच खासदार गजानन कीर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठाच धक्का बसला आहे.
शिवसेनेत फुट पडल्यावर शिंदे गटात दाखल होणाऱ्या पहिल्या फळीच्या खासदारांमध्ये प्रतापराव जाधव यांचा समावेश होता. मात्र, त्याचे धाकटे बंधू व मेहकरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव हे अद्यापही ठाकरे गटातच आहेत. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली आहे. मात्र, आता खासदार प्रतापराव जाधव यांनी नवा दावा केल्याने ठाकरे गटातील ते खासदार व आमदार नेमके कोण, याची चर्चा सुरु झाली आहे. शिंदे गटात आतापर्यंत १२ ते १३ खासदार दाखल झाले आहेत. तर ठाकरे गटात कायम असलेल्या खासदारांना आगामी निवडणुकीत निवडून येण्याची चिंता लागली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपशी असलेल्या युतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर शिवसेनेचे खासदार निवडून आले, असा दावा सातत्याने भाजपकडून केला जातोय.

160 total views, 3 views today