
वसई : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवी माहिती पुढे येत आहे. माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. तो माझी हत्या करून करू शकतो, अशी लेखी तक्रार श्रद्धाने २३ नोव्हेंबर २०२० रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली (Shraddha Walker Murder Case) होती. या तक्रारीवर पोलिसांनी तब्बल २६ दिवस चौकशीही केली होती. मात्र, चौकशी सुरु असतानाच आफताब आणि श्रद्धा यांनी आपापसात समझोता केल्याने हा तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला, अशी माहिती तुळींज पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब हा श्रद्धाला मारहाण करायचा. नोव्हेंबर २०२० मध्ये आफताबने तिला बेदम मारहाण केली होती. यामुळे ती तीन दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती, असे पोलिसांनी सांगितले.
या मारहाणीनंतर श्रद्धाने आफताबविरुद्ध नालासोपारा येथील तुळींज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीत तिने आफताब आपली हत्या करू शकतो, अशी शंका व्यक्त केली होती. आफताब माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकणार आहे, असे या तक्रारीत स्पष्टपण लिहिण्यात आले होते. हा अर्ज दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे या तकारीवर पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली, असा प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र, या प्रश्नावर तुळींज पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. श्रद्धाच्या अर्जावर आम्ही २६ दिवस चौकशी करत होतो, असे पोलिसांनी सांगितले. तुळींज पोलिस ठाण्याचे अधिकारी दोनवेळा श्रद्धा आणि आफताबच्या घरी जाऊन आले होते. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावूनही त्यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र श्रद्धा आणि आफताब यांच्यामध्ये समझोता झाल्याने हा अर्ज २६ दिवसांनी निकाली काढावा लागला, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. श्रद्धा आपल्या त्या तक्रारीवर कायम राहिली असती तर कदाचित ही घटना घडली नसती, असे दिल्ली पोलिसांना वाटतो.
269 total views, 3 views today