
नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या व्यक्तिगत अधिकारांच्या सुरक्षेसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून (Amitabh Bachchan filed a suit in Delhi High Court) ख्यातनाम विधिज्ञ हरिश साळवे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात बच्चन यांची बाजू मांडली. शुक्रवारी न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीनंतर न्या. नविन चावला बच्चन यांना अंतरिम दिलासा दिला आहे. न्यायालयाने एक मनाई आदेश जारी केला असून त्यात बच्चन यांच्या अनुमतीशिवाय त्यांचा फोटो, आवाज, नाव तसेच प्रतिमेच्या वापरास मनाई करण्यात आली आहे.
यासंदर्भात निर्णय देताना न्या. चावला यांनी नमूद केले की, अमिताभ बच्चन हे एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत. विविध जाहिरातींमध्ये त्यांच्या आवाज आणि नावाचा वापर केला जातो. मात्र, आता आपली उत्पादने तसेच सेवांचा प्रचार करण्यासाठी कुणालाही त्यांच्या अनुमतीशिवाय यांच्या सेलिब्रिटी स्टेटसचा वापर करता येणार नाही. बच्चन यांच्या व्यक्तित्व अधिकाराचे उल्लंघन करणारे साहित्य हटविण्यात यावे, असे निर्देशही न्यायालयाने प्रशासन तसेच दूरसंचार सेवा प्रदातांना दिले आहेत.
अमिताभ बच्चन या नावाचे एक वलय आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्या नावाचा गैरवापर होत आहे. याच भावनेने अमिताभ बच्चन यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या आवाजामुळे ओळखले जातात. अनेक जाहिराती, प्रमोशनमध्ये त्यांच्या आवाजाचा वापर केला जायचा. पण आता मात्र या गोष्टी करण्याला मर्यादा येतील, असे मानले जात आहे. याआधीदेखील अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजाचा चुकीचा वापर केला जात असल्याने नाराजी व्यक्त केली होती.
180 total views, 3 views today