
नागपूर : महाराष्ट्रातील वनसंपदा संवर्धन आणि वृक्षारोपण मोहिमेच्या बाबतीत महाराष्ट्राचे नाव ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्यास भाग पाडणारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जागतिक ख्यातीच्या ‘इंटरनॅशनल युनियन कन्झर्वेशन ऑफ नेशन’ (आययूसीएन) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘आययूसीएन’च्या प्रमुख अर्चना चटर्जी व वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्या हस्ते मुनगंटीवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चंद्रपूरच्या मूलरोड स्थित वन अकादमीत आयोजित दिमाखदार सोहळ्यात मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक वनीकरणाच्या सुनिता सिंग, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, शैलेश टेंभुर्णीकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. विधिमंडळ असो की मंत्रालयीन कामकाज सर्वच बाबतीत सुधीर मुनगंटीवार यांनी नेहमीच चौफेर वेगळी छाप उमटविली आहे. त्यांच्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीमुळे महाराष्ट्राच्या वनमंत्रालयाला देशातील पहिले ‘आयएसओ’ मानांकनही प्राप्त झाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आयएसओ’ प्रमाणपत्र वित्त व वनमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वन आणि वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी मुनगंटीवार यांनी सुरू केलेले अहोरात्र प्रयत्न यंदाही कायम आहेत. त्यामुळेच त्यांना जागतिक ख्यातीच्या ‘आययूसीएन’चा बहुमान बहाल करण्यात आला. वन अकादमीत आयोजित कार्यक्रमात ‘आययूसीएन’चे शैलेश टेंभुर्णीकर यांनी त्यांच्या कार्याची विस्तृत माहिती दिली. वाढत्या जागतिक प्रदूषणस्तरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी लोकचळवळ उभारण्यात आली आहे. प्रत्येक वृक्षावर खास ‘क्यूआर कोड’ लावण्यात आले आहेत. ‘चंद्रमा’ अॅपच्या माध्यमातून संबंधित कोड स्कॅन केल्यास प्रत्येक वृक्षाची माहिती व त्याचे महत्व नागरिकांना कळणार आहे.
राजकारणापलीकडे जात सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक, सर्वसमावेशक विकास व समाजकारणावर नेहमीच भर दिला आहक. त्यामुळेच त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सामान्यांना मोठा लाभ देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या मुनगंटीवार यांना ‘द सीएसआर जर्नल’नेही पुरस्कृत केले होते. महाराष्ट्राचे वित्तमंत्री असताना राज्य वनमंत्रालयाला ‘आयएसओ’ मानांकनासह अनेक पुरस्कारांचे मानकरी सुधीर मुनगंटीवार ठरले होते.
जीवा महाला गौरव..
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, तो दिवस ‘शिवप्रताप दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाजी महाराजांवर चाल करून आलेल्या अफजल खानाच्या थडग्याभोवती असलेले अतिक्रमण अलीकडेच राज्य सरकारने जमीनदोस्त केले. यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोलाची भूमिका निभावली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वेळोवेळी विनम्र आदरभाव दाखविणाऱ्या मुनगंटीवार यांना त्यामुळे प्रतिष्ठेचा जीवा महाला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यातील सरस्वती मंदिर मैदान नातू पार्क येथे सुवर्ण कड्याने मुनगंटीवार यांना गौरविण्यात येईल, असे पुरस्कार संयोजन समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी सांगितले.
170 total views, 6 views today