
मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुपारी घेऊन काम करतात, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांनी फक्त स्वप्न बघावीत. निवडणूक आली की अस्तित्त्व दाखवण्यासाठी मेळावे घ्यायचे. निवडणुकीच्या वेळी कोणाची ना कोणाची सुपारी वाजवायची हा धंदा मागील अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांनी चालू केलेला आहे (MP Vinayak Raut on Raj Thackeray). राज ठाकरे फक्त नक्कल करुन राजकारण करत आहेत. पायाला ठेच लागली तरी ते रुग्णालयात दाखल होतात. उद्धव ठाकरे यांचे नाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असून तीच राज ठाकरे यांची पोटदुखी असल्याचा अजब दावाही राऊत यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात मनसेने आतापर्यंत केलेल्या आंदोलनावर भाष्य केले होते. राज ठाकरे म्हणाले होते की, कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचे कारण सांगून घरात बसले होते. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखे वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्या-त्याच्या सोबत ते गेल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली होती.
142 total views, 3 views today