
-पुरुषोत्तम आवारे पाटील
राज्याच्या सगळ्याच जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. थंडीच्या या महिन्यात सुद्धा राजकीय वातावरण गरम व्हायला सुरुवात झाली आहे. जे घरासमोरून जाताना आजवर आपल्याकडे बघत नव्हते, स्माईल सुद्धा देत नव्हते ते लोक आता थांबून नमस्कार करतात ,ख्याली खुशाली विचारतात या अचानक बदललेल्या मौसमावरून सगळ्यांच्या लक्षात आले असेल की निवडणूक आली आहे. कारण लोकशाहीत मतदान,निवडणूक हे एकमेव असे कारण आहे की अनेक तिसमार खा याच काळात कंबर वाकेपर्यंत झुकतात. नाक दाबतील , नाकाला रुमाल लावतील परंतु वास मारणाऱ्या वस्त्यात लोकांची विचारपूस करायला जातील. जावेच लागते ,मजबुरी आहे. ज्या भागांकडे लोकप्रतिनिधी कधी ढुंकून बघत नाहीत त्याच वस्त्यात राहणाऱ्या लोकांनी आजवर लोकशाही जिवंत ठेवली आहे. पॉश वस्तीतले पांढरपेशे तर नेहमीच लोकशाही आणि नेत्यांच्या नावाने बोटे मोडून घरातून बाहेर निघायचे नाव घेत नाहीत.
आजपासून वऱ्हाडात ग्राम पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. अकोला जिल्ह्यातील २६६ ग्राम पंचायतीचा त्यात समावेश आहे. अलीकडच्या काळात ग्राम पंचायत सदस्यांना मिळणारा सन्मान आणि इतर फायदे बघता आपणही पंचायती केल्या पाहिजेत असे वाटणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ज्यांच्या अंगात सामाजिक कार्याचा गुण आहे जे बरिचवर्ष निरपेक्ष भावनेने लोकांच्या मदतीला जातात. शेजारधर्म किंवा माणुसकी खातीर जे सतत कुणाच्या तरी कामात पडत असतात अशा तरुणांना खरंतर या कामासाठी गावकऱ्यांनी जाणीवपूर्वक पुढे केले पाहिजे. कारण पंचायत मध्ये जाऊन पुढे जे करायचे असते त्याची सुरुवात आधीच अशा लोकांनी केलेली असते. ज्यांना थोडेफार सामान्य ज्ञान, शिक्षण आणि लोकांच्या प्रश्नांची जाणीव ,अभ्यास आहे ,जे सरकारी कार्यालयाच्या काम करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून आहेत, खरा मान त्यांना दिला पाहिजे.
कोण गावासाठी झटे
कोण उठतो रोज पहाटे
कोण पायी फिरोन करी वारी ,
गावाची आमुच्या ?
या शब्दात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पंचायत साठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. गावातल्या नागरिकांसाठी नेहमी कोणती व्यक्ती काम करीत असते. संकटात पटकन गावकऱ्यांच्या तोंडी कुणाचे नाव येते ? पहाटे उठून गावाची चक्कर घालणारा आणि गावात चालणाऱ्या विकास कामांची जागरूक नागरिक म्हणून चौकशी करणारा कोण आहे ?त्याची निवड कशी केली पाहिजे याचे उत्तम दिशादर्शन ग्रामगीतेत राष्ट्रसंतांनी करून ठेवले आहे. प्रत्येक गावात बोटांवर मोजण्याएवढी काही माणसं, व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांच्या शब्दावर गावातील लोक भरवसा ठेवतात. सगळ्या जाती,धर्मात ज्यांच्या शब्दाला मान दिला जातो. अशा लोकांनी आपल्या गावाचे भवितव्य योग्य हातात जाईल याचे नियोजन केले पाहिजे.
आपण ज्याला आपला प्रतिनिधी म्हणून पाठवणार आहोत त्यासाठी काही निकष असतात त्यात भावी सरपंच किंवा पंच बसला पाहिजे. पंच किंवा सरपंच याला भरपूर वेळ असला पाहिजे. थोडक्यात या पदावर असणारा व्यक्ती रिकामा असला पाहिजे. त्याचे शिक्षण किमान बारावी तरी असले पाहिजे. इंग्रजीची तोंडओळख , आवश्यक सामान्य ज्ञान आणि कोणताही मुद्दा पटवून सांगण्याची त्याला उत्तम क्षमता असली पाहिजे. लोकशाहीत ज्याला आपला प्रश्न,मुद्दा किंवा म्हणणे पटवून सांगता येते त्याची प्रगती होते कारण लोकशाहीत बोलल्याचे बोन्डे खपतात , मुक्याचा कापूसही कुणी घेत नसतो. थोडक्यात ज्याच्याकडे वेळ,बुद्धिमत्ता ,नियोजन , वक्तृत्व आणि सामान्य ज्ञान आहे अशा व्यक्तींना या पदांसाठी पुढे करायला हवे. या सगळ्या पात्रता असणाऱ्या लोकांकडे जर पैसा नसेल तर गावाच्या व्यापक हितासाठी सर्वानी एकत्र येऊन त्याची उभारणी केली पाहिजे.
ज्यासी गावाचा जिव्हाळा,
जो कार्यज्ञानाचा पुतळा
तोचि सुखी करील गाव सगळा,
निवडोनि देता !
निवडणुकीत पैसा आणि श्रीमंत उमेदवार हा निकष लावला जातो आणि ज्यांना गावाच्या बाबतीत कोणताही कळवळा नसतो, सार्वजनिक कार्यात काहीही स्वारस्य नसते किंवा त्यातले कळत नाही असे लोक निवडून येतात. त्यामुळे गावाचा विकास थांबतो ,अनावश्यक आणि अप्रासंगिक बाबींचा गवगवा होऊन त्याचे गावांवर विपरीत परिणाम होतात. गावाचा,त्यात राहणाऱ्या लोकांचा पर्यायाने प्रगतीचा ध्यास ज्यांना असेल अशी माणसं या जबाबदारीसाठी निवडली जावी असे राष्ट्रसंत सुचवतात. ज्याला लोकांच्या विकासाचा जिव्हाळा आणि ध्यास असेल तोच गावाला खऱ्या अर्थाने सुखी करू शकतो. अन्यथा ग्रामसेवकाला हाताशी धरून आडमार्गाने ठेकेदारी करणारे अनेक लोकप्रतिनिधी गावांच्या वाट्याला आले आहेत.
संवाद-9892162248
311 total views, 3 views today