
नागपूर : राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात विधिमंडळ सभागृहात निंदा व्यंजक प्रस्ताव मांडला जावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरात केली. हा योगायोग नसून सुनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप केला. अंधारे म्हणाल्या, गेल्या काही दिवसात माझ्यावर बरीच मुक्ताफळे उधळली गेली. विदर्भातील भावांना भेटायला, ओवाळण्यासाठी मी आली आहे या शब्दात त्यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना विरोधकांचा समाचार घेतला. गोंदिया, भंडारा येथील सभा आणि पक्ष संघटनात्मक बैठकांसाठी त्या आजपासून पूर्व विदर्भात आहेत. महापुरुषांविषयीचा अवमान हा काही निव्वळ योगायोग मला वाटत नाही असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि अलीकडेच आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाकडे लक्ष वेधत त्यांनी हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुनियोजित षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेच्या संदर्भात संदर्भात उस्फूर्तपणे प्रतिक्रिया देणारे देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवरायांचा अवमान होत असताना मात्र बराच वेळ गप्प होते असा आरोप केला. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पराभव समोर दिसत असल्यानेच उमेदवारी मागे घेण्यात आली त्याचप्रमाणे राज्यपाल कोशारी यांची गच्छंती अटळ असल्याचे दिसत असल्याने भाजपतर्फे वातावरण निर्मिती केली जात असल्याचे टीकास्त्रही सुषमा अंधारे यांनी सोडले.
415 total views, 3 views today