
चंद्रपूर. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या माकडाचा चंद्रपूर येथील जिल्हा कृषी अधीक्षकांनी (District Agriculture Superintendent, Chandrapur) शासकीय कार्यालय परिसरातच दफनविधी (Burial within the office premises ) करून श्राद्ध घालण्याचे प्रयोजन केले आहे. या दफन विधी व श्राद्धची खमंग चर्चा शासकीय कार्यालयात सुरू आहे. येथील जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब भराटे २९ नोव्हेंबरला नागपूर येथून चंद्रपूरला (Chandrapur) येत असताना त्यांना वरोरा गावाजवळ एक माकड अपघातात दगावल्याचे दिसून आले. 2 किमी अंतरावर आल्यानंतर भराटे यांनी आपले वाहन मागे वळवले आणि मृत माकड वाहनात टाकून त्यांनी थेट कृषी अधीक्षक कार्यालय गाठले. रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांनी माकडाला विधीवत पुरले. त्यानंतर त्यावर एक दगड ठेवून त्याला शेंदूर फासला. भराटे एवढ्यावरच थांबले नाही, तर माकडाच्या समाधीवर दिवा लावण्याची जबाबदारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्यावर सोपवली. रोज रात्री या समाधीवर दिवा लावण्याचे काम हा कर्चचारी नित्यनेमाने करीत आहे. ज्या परिसराती माकडाला पुरण्यात आले, तो कृषी संशोधन केंद्राचा परिसर आहे. आधुनिक शेतीसंदर्भात येथे वेगवेगळे प्रयोग केले जातात.
कर्मचाऱ्यांनी घडल्या प्रकाराची कुठे वाच्यता केली नाही. परंतु, माकडाच्या दफनविधीच्या चर्चेला तोंड फुटले. भराटे यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठक नेहमीसारखीच असेल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती. मात्र, भराटे यांनी पुन्हा माकडाचा विषय काढला. माकडाचे श्राद्ध घालायचे आहे, त्यासाठी वर्गणी गोळा करू, असा प्रस्तावही त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर ठेवला. साहेबांचाच आदेश असल्याने एकही कर्मचारी विरोध करू शकला नाही.
येत्या दोन दिवसात माकडाच्या श्राद्धाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर याच शासकीय परिसरात मंदिरसुद्धा बांधण्याची त्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. माकडाचा शासकीय कार्यालय परिसरात दफनविधी, श्राद्ध आणि साहेबांची श्रद्धा हा विषय कृषी विभागात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. एवढेच नाही तर, मंदिराचेही प्रयोजन असल्याने चर्चांना पेव फुटले आहे. मृत माकडाचा अंत्यविधी हा वन्यप्राण्यांचा सन्मान दर्शविण्यासाठी केला असल्याचे कृषी अधीक्षक भराटे यांचे म्हणणे आहे.
2,664 total views, 3 views today