
मुंबईः सीमावादावरून सुरु असलेल्या तणातणीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनीही उडी घेतली आहे. २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जात असून त्यासाठी महाराष्ट्राला नाहक छळले जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जात असून हे प्रकरण साधेसोपे नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटे पिरगळली जातील, हे बघावे. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावे, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज ठाकरेंनी केंद्र, राज्य सरकारसह कर्नाटक सरकारलाही खडसावले आहे. राज ठाकरे म्हणाले, कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे. आज अनेकांची कुलदैवते कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवते महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचे हित असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतेय हे तर उघड दिसतेय, पण येथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवे. हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा. पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर आमचे उत्तर पण तितकेच तीव्र असेल हे विसरू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
420 total views, 3 views today