
संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात सरसंघचालकांचे आवाहन
नागपूर: आम्हाला आत्मनिर्भर भारताची निर्मिती करायची असून हे केवळ संघाचे काम नाही तर, संपूर्ण समाजाने एक होऊन यात सहभागी झाले पाहिजे. यासाठी समाज एका दिशेने काम करण्यासाठी तयार होईल, त्या दिवशी संघाची गरज राहाणार नाही. समाजाने आपले काम करावे, यासाठी संघाचे प्रयोजन आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat) यांनी आज नागपुरात बोलताना केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा (RSS Sangh Shiksha Varg) समारोप गुरुवारी सायंकाळी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर झाला. काशीपीठाचे 87 वे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थिती प्रशिक्षणार्थींना जाहीर मार्गदर्शन केले. साऱ्या जगाला भारताची आवश्यकता आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. “जी-२०’ समुहाचे अध्यक्षपद भारताकडे येणे, ही सामान्य बाब नसली तरी आम्हाला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. यासाठी समाजाला वाटचाल करायची आहे. भारतीय ऋषीमुनींनी आपल्या तपश्चर्येने संपूर्ण मानव समाज एक असल्याचे सत्य जाणले होते. विश्वकल्याणाची कामना करणाऱ्या ऋषींच्या तपश्चर्येतून ओजस्वी व तेजस्वी राष्ट्राची निर्मिती झाली. वेगळे असणे वाईट नाही. परंतु गंतव्य एक असले पाहिजे. खानपान, रितीरिवाज, चालीरिती वेगळ्या असल्या तरी चालते. ते कायम ठेवून एकात्मभाव वाढवणारा हिंदु आहे. आम्ही संपूर्ण जगाला सुखकारक जीवनपद्धती देऊ, असे डॉ. भागवत म्हणाले.
या जगात दुर्बलांचे कोणीही ऐकत नाही. हे लक्षात घेता आम्हाला सामर्थ्यवान व्हायचे आहे. दुबळ्यांचे रक्षण करणे हे सबळांचे कर्तव्य आहे. आम्हाला जग जिंकायचे नाही तर ते जोडायचे आहे. जगात वाईट शक्ती आहेत. त्यामुळे आम्हाला जिंकू शकणार नाहीत इतके शक्तीवान आम्हाला व्हायचे आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले.
जाती आणि वर्गाच्या संघर्षातून आम्ही आपसात भांडलो. ते संघर्ष आता संपले. पण, काही गोष्टी कायम आहेत. संविधानाने राजकीय समता दिली. पण सामाजिक समता आणण्यासाठी सद्बावना असणे गरजेचे आहे, असे नमूद करताना आम्हाला व्यक्तिगत आणि सामाजिक शिस्तीचे पालन केले पाहिजे, असे आवाहनही डॉ. भागवत यांनी यावेळी केले.
जगाच्या पाठीवर भारत अध्यात्मिक संस्कृती असलेला एकमेव देश आहे. महान विभुती करीत आलेले धर्मकार्य रा. स्व. संघ करीत असल्याचे असे प्रतिपादन श्री. श्री. १००८ जगद्गुरू डाॅ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी केले. आजच्या पिढीचे आचार विचार बदलत चालले आहे. त्यांच्यातून देशप्रेमाची भावना तसेच सेवा भाव लोप पावत चालला आहे. त्यांच्यात या गोष्टी रूजवण्यासाठी रा. स्व. संघाची स्थापना झाल्याचे स्वामी यांनी सांगितले. हिंदु धर्म वटवृक्ष आहे. त्याच्या अनेक शाखा आहेत. वीरशैव लिंगायत पंथही हिंदु धर्माचीच एक शाखा आहे असे स्वामी म्हणाले.
वर्गाचे सर्वाधिकारी व तेलंगणाचे प्रांत संघचालक दक्षिणामूर्ती तसेच नागपूर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. सुरुवातीला प्रशिक्षणार्थींनी शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. पद्मश्री डाॅ. श्रीधर वेम्बुजी, ख्यातनाम लोकगीत पद्मश्री अन्वरखान मंगरीयारजी, विप्रोचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी, वैजयंती पांडा आदी मान्यवर यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
असा होता वर्ग
यावर्षी 14 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या या वर्गात एकूण 735 शिक्षार्थी सहभागी झाले होते.विशेष म्हणजे एकाच वर्षात दोनदा संघ शिक्षा वर्गाचे आयोजन 1951 नंतर पहिल्यांदाच करण्यात आले. याचवर्षी मे महिन्यात तृतीय वर्ष संघशिक्षा वर्ग पार पडला होता. कोरोनामुळे गेली 2 वर्षे या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन झाले नाही. त्यामुळे मे महिन्यात झालेल्या वर्गासाठी इच्छुक शिक्षार्थींची संख्या फार मोठी होती. एकाच शिबिरात सर्वांना सामावून घेणे शक्य नसल्याने पुन्हा एका शिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
222 total views, 6 views today