
– सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.१०:लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाने लावणीचा अभिजात सुर हरपल्याची शोक भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली आहे. बैठकीची लावणी किती समृध्द असावी याचा वस्तुपाठ सुलोचनाताईंनी घालुन दिला होता. अनेक तमाशाप्रधान चित्रपटातून त्यांनी ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. चपळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातुन ठसका व खटका देण्याचे काम सुलोचनाताईं इतके कोणीही उत्तम करू शकलेले नाही. पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखडयाची सुरूवात ठसकेबाजच झाली पाहीजे, असे सुलोचनाताईंचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावण्यांतून येतोच. सुलोचनाताई लावणीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शास्त्रीय गायकीचे कोणतेही विधीवत शिक्षण न घेता दीर्घकाळ त्यांनी लावणीच्या माध्यमातुन रसिकप्रेक्षकांच्या मनावर उमटविलेला ठसा कधिही विसरू शकणार नाही. त्यांनी गायलेल्या लावण्यांनी जनमानसांच्या हृदयात मानाचे स्थान मिळविले आहे. लावणीला राजमान्यता, लोकमान्यता व प्रतिष्ठा मिळवून देणा-या सुलोचनाताईंच्या निधनाने या क्षेत्राची कधिही भरून न निघणारी हानी झाली असल्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
618 total views, 3 views today