
नागपूरः समृद्धी महामार्गाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला सुरुवातीला कसा विरोध झाला, याचा गौप्यस्फोट करताना ठाकरे गटाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्धल ऋतज्ञता व्यक्त केली. समृद्धी महामार्ग वेगाने पूर्ण होण्यात ज्या अधिकाऱ्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली, अशा अधिकाऱ्यांची नावे घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कमिटमेंटचे कौतूक केले. फडणवीस यांनीही आपल्या भाषणात या अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आज मी स्वत:ला भाग्यवान्य समजतो की आमच्याच कारकिर्दीत या महामार्गाचं लोकार्पण होत आहे. या प्रकल्पात सुरुवातीला खूप अडचणी आल्या. जमीन अधिग्रहणाला बराच विरोध झाला. लोकांना विरोध करायला लावला गेला. हा प्रकल्प होऊ नये, जमिनी दिल्या जाऊ नयेत म्हणून बैठका झाल्या” असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे व ठाकरे गटावर निशाणा साधल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “अडचणी येऊनही मी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यावर कुशलपूर्वक सगळ्यांना सोबत घेऊन काम केले. इतिहासात असे दुर्मिळ असते की सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रकल्पावर काम करणारे सगळे लोक सोबत होते. शेतकरी सुरुवातीला साशंक होते. पण, आम्ही ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. या प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिल्या गेल्याने जमीन अधिग्रहणाचा सगळ्यात मोठा टप्पा विक्रमी वेळेत पूर्ण झाला” असा उल्लेख शिंदे यांनी यावेळी केला.
488 total views, 3 views today