
नागपूर -राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयात सीबीआय प्रकरणी आज जामीन मंजूर झाल्याचे वृत्त कळताच नागपूर येथील जीपीओ चौकातील बंगल्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त आणि देशमुख यांना जामीन हा दुग्ध शर्करा योग असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. ढोलताशांच्या गजरात, बुंदीचे लाडू परस्परांना भरवत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. न्यायालयीन प्रक्रियेत देशमुख यांच्या घरी येण्यास काहीसा वेळ लागणार असला तरी ते लवकरच निर्दोष बाहेर येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वात हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, शहर उपाध्यक्ष व प्रवक्तया नूतन रेवतकर, प्रणव म्हैसेकर ,अध्यक्ष नागपूर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आदी अनेक पदाधिकारी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना नूतनताई रेवतकर ल यांनी भाजपरुपी कंसाने अनिल देशमुख रुपी वासुदेवाला कारागृहात टाकले. आज त्यांना जामीन मिळाला उद्या ते निश्चितच निर्दोष सिद्ध होतील. फार काळ अन्याय कोणावरहो करता येत नाही हे सिद्ध होईलच असा विश्वास व्यक्त केला. देशमुख यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोठेकर यांनी सत्य परेशान हो सकता पराजित नही.. असे स्पष्ट करीत शरद पवारांच्या जन्मदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे गिफ्ट मिळाल्याची भावना बोलून दाखवली.
2,053 total views, 3 views today