
‘चला जाणूया नदीला’ मोहिमेचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी उद्या, दि. 15 डिसेंबर रोजी आम नदी जलसंचयन क्षेत्रातील गावांमध्ये शिवार फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत नदी काठावरील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या विविध घटकांचा अभ्यास करून त्यानुषंगाने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज चला जाणूया नदीला या मोहीमेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या मोहीमेसाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीला पूरक ठरणा-या गाव तसेच तालुका पातळीवरही समिती स्थापन करण्यात येणार आहे. नाग आणि आम नदीच्या जलसंचयन क्षेत्रातील गावांमध्ये आमसभा घेण्यात आली . यासंदर्भातील आढावाही जिल्हाधिका-यांनी यावेळी घेतला.
उपजिल्हाधिकारी पियूष चिवंडे,सहायक वनसंरक्षक सुरेंद्र काळे, राज्यस्तरीय सदस्य डॉ. प्रवीण महाजन, नदी बचाव क्षेत्रात काम करणारे प्रद्युम्न सहस्त्रभोजने, डॉ. विजय घुगे, मुन्ना महाजन, अरविंद कडबे यांच्यासह जिल्हास्तरीय समितीचे सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित होते. या अभियानाअंतर्गत नद्या प्रदुषणमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने या अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यासाठी नाग नदी आणि आम नदीची निवड केली आहे.

387 total views, 3 views today