
उद्यापासून अधिवेशन, सत्ताधारी- विरोधक सज्ज
नागपूर. तब्बल दोन वर्षानंतर नागपुरात (Nagpur) सोमवार, 19 डिसेंबरपासून राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनामुळे पुन्हा एकदा वैदर्भियांचा अपेक्षा उंचावल्या (Expectations of Vaidarbhians were raised) असून, राज्यातील नवे सरकार विदर्भाच्या झोळीत विकासाचे दान टाकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या अधिवेशनासाठी राज्य सरकार नागपुरात दाखल (state government entered Nagpur for the session ) झाले असून, रविवारी दुपारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक आणि त्यानंतर परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री व मंत्रीमंडळातील इतर सदस्य सायंकाळी 5 वाजता विरोधकांसोबत चहापान कार्यक्रम होईल. दरम्यान, या चहापानाला जायचे की नाही वा बहिष्कार टाकायचे याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विरोधी पक्षनेते अजीत पवार यांच्या निवासस्थानी दुपारी 12 वाजता होणाऱ्या बैठकीनंतर ठरविण्यात येणार आहे.
कोरोनानंतर नागपुरात अधिवेशन होत आहे. या काळात महाविकास आघाडी सरकारला उलथवून शिंदे गट व भाजपने नवे सरकार आणले. नव्या सरकारच्या पाच महिन्याच्या कार्यकाळातील हे पहिलेच पुर्णकालीक अधिवेशन आहे. या काळात राज्यात अनेक राजकिय घडामोडी घडल्या. राजकिय टोलेबाजीसह एकमेकांवर टीकेची एकही संधी सत्तापक्ष व विरोधकांनी सोडली नाही. त्यामुळे अधिवेशनात याचे पडसाद उमटतील.
अधिवेशनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी रात्री नागपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी सकाळी 8.05 वाजता नागपुरात येत आहे. विधानसभाध्यक्ष राहूल नावेंकर दुपारी 3 वाजता नागपुरात येतील. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे शनिवारी सकाळीच नागपुरात दाखल झाल्या. त्यानंतर दुपारी 4 वाजता त्यांनी विधीमंडळ अधिवेशनाचा अधिकाऱ्यांसमवेत आढावाही घेतला. तर, राज्य मंत्रीमंडळातील सदस्य रविवारी सकाळीच नागपुरात डेरेदाखल होत आहे. राज्यातील अनेक महत्वाच्या विषयांवर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, वादाचे अनेक मुद्यांवरून अधिवेशन वादळी ठरेल असे संकेत आहेत.
वादळी किनार
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला वादळी किनार आहे. शिवसेना सर्वप्रथम छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात नागपुरातील अधिवेशनातच फुटली. त्यानंतर नारायण राणे यांच्या नेतृत्वातही शिवसेना फुटल्यानंतर कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. दोनच दिवसांपुवीं नागपूर अधिवेशनात बघाच, असे संकेत सत्तापक्षातील काही आमदार देत असल्याने यावेळी नेमके काय होणार याकडे राजकियदृष्टया सर्वांची नजर राहणार आहे.
पॅकेजसाठी प्रसिद्ध
नागपूरचे अधिवेशन पॅकेजसाठीही प्रसिद्ध् आहे. कॉंग्रेसच्या दोन सरकारने राज्यातील अतिवृष्टी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघता पॅकेज जाहीर केले. अशोक चव्हाण आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात नागपूर अधिवेशनातच पॅकेजची घोषणा केली होती. त्यानंतर युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरच्या अधिवेशनातच विदर्भासाठी पॅकेज जाहीर करतानाच मोठी मदत जाहीर केली होती, हे विशेष.
अनेक वादळी विषय
या अधिवेशन काळात अनेक वादळी विषय चचेंला येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी काढलेले अवमानकारक वक्तव्य, राज्यातील महापुरूषांचा सातत्याने होणारा अवमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यातील उसळलेला वाद, कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा जत तालुक्यावर दावा, राज्यात झालेल्या अतिवृष्टीसाठीची मदत, महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्रातून गुजरात व इतर राज्यात पळवून नेलेले उद्योग यासह इतर अनेक वादळी विषय अधिवेशन काळात सभागृह व सभागृहाबाहेर चांगलेच वादळ निर्माण करतील.
396 total views, 3 views today