
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे आज सायंकाळी नागपूरला आगमन झाले. नियोजित वेळेपेक्षा त्यांचे आगमन उशिरा झाल्याने आज दुपारी 4 वाजता होणारी शिवसेना आमदारांची, मविआची संयुक्त बैठक आता उद्या सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रसार माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला. नागपुरातील त डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशाचा गजर आणि गुलाब पुष्पांचा वर्षाव असे जंगी शक्ती प्रदर्शन यानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. आमदार दुष्यंत चतुर्वेदी, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, दीपक कापसे, नितीन तिवारी, किशोर कुमेरिया आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांचा नागपुरात दोन दिवस मुक्काम राहणार असून जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर हे दोघेही विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच आमने-सामने येणार आहेत हे विशेष.
शिवसेना कार्यालयाचा वाद दोघांनाही कार्यालय विभागून देत सोडविण्यात आला असला तरी सीमावाद आणि इतर प्रश्नी विधिमंडळाच्या कामकाजात या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटाचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळू शकते. सध्या सुरू असलेला सीमावाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अधिकच आक्रमकपणे मांडला जाण्याची शक्यता आहे. 22 व 23 रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे देखील नागपुरात येत आहेत. आज सायंकाळी राज्यपाल भगतसिंग कोशियारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही नागपुरात आगमन झाले.
1,464 total views, 3 views today