
आपल्या भारत देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत, महात्मा गांधी (M K Gandhi) हे जुन्या भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित ‘अभिरूप न्यायालयात’ अमृता फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान मोदींना राष्ट्रपिता असल्याचे सांगत वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्याचा आरोप वकिलांकडून अभिरूप न्यायालयात अमृता फडणवीस यांच्यावर करण्यात आला. यावर त्यांनी हे उत्तर दिले.
अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित अभिरूप न्यायालयात वकील अजेय गंपावार यांनी आठ पानांचे आरोपपत्र सादर केले. या प्रकरणी अभिरूप न्यायालयातील न्यायमूर्ती ॲड. कुमकुम सिरपूरकर यांच्या समक्ष सुनावणी झाली. सुनावणीत अमृता फडणवीस यांनी आपली बाजू स्वत: मांडत लावलेले सर्व आरोप फेटाळून लावत दिलखुलास गप्पा मारल्या. यापैकी काही आरोप त्यांनी मान्यही केले. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल होताच उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
मला फक्त आई आणि सासूची भीती
अमृता फडणवीस ‘अभिरूप कोर्ट’मध्ये म्हणाल्या की, “मी स्वत: कधीही राजकीय वक्तव्यं (Political Statement) करत नाही, मला त्यात रस नाही. माझ्या वक्तव्यांना सामान्य लोक ट्रोल करत नाहीत. हे काम राष्ट्रवादी (NCP) किंवा शिवसेनेच्या (Shivsena) मत्सरी लोकांचं आहे. मी त्यांना फारसे महत्त्व देत नाही. मला फक्त आई किंवा सासूची भीती वाटते. बाकीच्यांची मला पर्वा नाही.”
राजकारणात एंट्री घेण्याच्या प्रश्नावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, “मला राजकारणात येण्यात रस नाही. मी माझे 24 तास राजकीय कामासाठी देऊ शकत नाही. माझे पती 24 तास समाजाच्या कामासाठी देतात. म्हणूनच जे राजकारण आणि समाजासाठी 24 तास देऊ शकतात, तेच राजकारण करण्यास पात्र आहेत. देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत.”
तीन वर्षांपूर्वीही अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा राष्ट्रपिता असा उल्लेख केला होता. त्यानंतरही त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र त्या आपल्या वक्तव्यावर त्या ठाम राहिल्या होत्या. मात्र, त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत
देशाचे राष्ट्रपिता एकच आणि ते म्हणजे महात्मा गांधी ! -नाना पटोले संतापले
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा अपमान गेल्या काही दिवसात भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक करत आहे. या प्रकरणी भाजपा नेत्यांनी अजून माफी मागितलेली नाही. उलट दररोज कोणीतरी महापुरुषांचा अपमान करतच आहे. आज पुन्हा एकदा महापुरुषांचा अपमान केला गेला. महात्मा गांधी हे जुने राष्ट्रपिता आता नरेंद्र मोदी नवे राष्ट्रपिता आहेत असे म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केला आहे पण या देशाचे राष्ट्रपिता एकच आहेत आणि ते म्हणजे महात्मा गांधी, इतर कुणाची ती पात्रता नाही, असा समाचार प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला.
प्रसार माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काही लोकांना नवीन भारत हवा आहे, या नव्या भारतात लोकशाही, संविधान धाब्यावर बसवून काही मुठभर लोकांच्या हाती सर्व आर्थिक व्यवहार देण्यात आले आहेत पण लोकांना मात्र जुनाच भारत पाहिजे, नवीन भारत नकोच आहे. या नव्या भारतात कोणी स्वतःची पाठ थोपटून घेत असेल तर त्यांनी ती थोपटून घ्यावी. काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श झाले आता नवीन आदर्श नितीन गडकरी आहेत, असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला होता. आता काही लोकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी जुने राष्ट्रपिता झाले नरेंद्र मोदी नवे राष्ट्रपिता आहेत असे म्हणून अपमान केला. राष्ट्रपिता व महापुरुषांचा अपमान करू नका अशीच आमची विनंती आहे, जे असा प्रयत्न करतील त्यांना जनताच धडा शिकवेल. अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात असा उल्लेख केल्यानंतर नवा वाड सुरू झाला आहे. महापुरुषांचा अपमान करुन त्यांचे मोठेपण कमी होत नाही पण अशा प्रकारचा खोडसाळपणा वेळीच थांबवला पाहिजे, असेही पटोले म्हणाले.
364 total views, 3 views today