
नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन काळापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. विधानसभेने ठरावाच्या माध्यमातून त्यांचे सदस्यत्व या कालावधीसाठी निलंबित केले. विधानसभेच्या अध्यक्षांबद्धल पाटील यांनी अपशब्दांचा वापर केला. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून जयंत पाटील यांनी “तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका”, असे वाक्य उच्चारले. त्यांच्या या वाक्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापलेले दिसते.
यावेळी सत्ताधारी बाकांवरून आमदारांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. “जयंत पाटील यांना निलंबित करा”, अशी मागणी आमदारांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही “जयंत पाटील, हे आपल्याकडून अपेक्षित नाही”, असं म्हणत नाराजी व्यक्त केली आणि कामकाज तहकूब केले. या घटनाक्रमानंतर विधानसभेचे कामकाज तीन ते चार वेळा तहकूब झाले.
यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षांविषयी असंवैधानिक शब्दप्रयोग केल्याचा आरोप जयंत पाटलांवर ठेवण्यात आला. यावर विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटलांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची कारवाई केली.
1,011 total views, 3 views today