
शंभूराज देसाई यांची विधानसभेत घोषणा ; रवी राणांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
नागपूर. उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाची राज्य गुप्तचर आयुक्तांकडून चौकशी करून अहवाल मागविला जाईल. पुढे येणारी माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली देत पुढील कारवाई केली जाईल, अशी घोषणा शुक्रवारी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली. या प्रकरणी आमदार रवी राणा यांनी लक्षवेधीद्वारे मुद्दा उपस्थित केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावतीच्या पोलिस आयुक्तांना फोन करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्याचसाठी पोलिसांनी रॉबरीच्या दिशेने तपास नेला, असा आरोपही राणा यांनी सभागृहात केला. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यामागेही तपासाचा ससेमीरा लागण्याची शक्यता आहे. आमदार राणा म्हणाले, उमेश कोल्हे हिंदू विचारांचे होते. हिंदू विचारांचा प्रचार, प्रसार ते करायचे. त्यांनी हिंदू विचारांच्या फेवरने पोस्ट टाकली. त्यामुळे त्यांना अनेकदा धमक्या आल्या. धमक्याची तक्रार केल्यानंतरसुद्धा अमरावतींच्या सीपींनी लक्ष दिले नसल्याचे ते म्हणाले.
आमदार राणा म्हणाले की, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर सीपींना फोन केला. त्यांच्या सांगण्यावरूनच या प्रकरणाचा तपास रॉबरीच्या दिशेना झाला. त्यात जवळपास एका महिन्याचा वेळ गेला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि मीसुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेलो. ही केस कशी दाबली जातेय, हे सांगितले. त्यांनी ‘एनआयए’ची चौकशी लावली. ‘एनआयए’ची टीम दिल्लीहून अमरावतीला आली. तेव्हा लक्षात आले. नुपूर शर्मांच्या पोस्टला फेवर केले. समर्थन केले. त्यामुळे उमेश कोल्हे यांची भरचौकात हत्या केल्याचे समोर आले.
‘एसआयटी’ चौकशी करा
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्नन केला. त्यामुळे या प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी करावी. याप्रकरणी सीपी आरती सिंग यांचे निलंबन झाले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या फोनची चौकशी झाली पाहिजे. उमेश कोल्हे हत्याकांड झाल्यानंतर दहा ते अकरा जणांना अटक केली. मात्र, एक महिन्यानंतर या प्रकरणाला का दाबण्यात आले. ‘एनआयए’च्या माध्यमातून चौकशी का करावी लागली. कारण कुठे तरी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी करावी, अशी मागणी राणा यांनी केली.
पंधरा दिवसांत अहवाल
गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, हा लक्षवेधी बाहेरचा प्रश्न आहे. मी लक्षवेधी पुरतेच ब्रीफिंग घेतलेले आहे. तरी सुद्धा आपली या सभागृहाची प्रथा, परंपरा आहे. सभागृहात सदस्य जे बोलतात ते सत्य मानून त्याच्यावरती कार्यवाही करायची असते. उमेश कोल्हे हत्याप्रकरणाची सविस्तर माहिती रवी राणा यांच्याकडून घेतली जाईल. त्यांचा आक्षेप तिथल्या पोलिस आयुक्तांवर आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल पंधरा दिवसांच्या आत राज्य गुप्तचर आयुक्तांकडून मागवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
791 total views, 3 views today