
धर्मांतरण प्रकरण : संपत्तीची एसीबीकडून चौकशी
नागपूर. दबाव आणून धर्मांतरण सुरू असल्याचा विषय लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत मांडण्यात आला. नगर जिल्ह्यातील गाजत असलेल्या धर्मांतरण प्रकरणी ‘पीआय’ प्रताप दराडे याला पोलिस नियंत्रण कक्षात हलवण्याचे निर्देश शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. एवढेच नव्हे तर दराडे याच्या संपत्तीची ‘एसीबी’कडून चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राम सातपुते यांनी नगर जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनरी कमल सिंघ याने दलित, मातंग, आदिवासींचे धर्मांतरण सुरू असल्याच्या घटनेकडे लक्षवेधीतून लक्ष वेधले. ‘पीआय’ प्रताप दराडे याचे धर्मांतराला संरक्षण असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला. ‘पीआय’ दराडेंवर कारवाई करणार का? त्याच्या संपत्तीची चौकशी करुन निलंबित करण्यात यावे अशी मागणी सातपुते यांनी केली.
लक्षवेधीवर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी धर्मांतरण प्रसंगी गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. पाच महिने होऊनही आरोपी ख्रिश्चन मिशनरी कमल सिंघ फरार असल्याची वस्तुस्थिती आहे. अप्पर पोलिस अधीक्षकामार्फत पीआय प्रताप दराडे याची चौकशी केली जाईल. आणि तोपर्यंत त्याला जिल्हा नियंत्रण कक्षात हलवण्यात येईल अशी घोषणा शंभूराज देसाई यांनी केली. हरिभाऊ बागडे यांनी गावपातळीवर दखल घेतली जावी असे सांगितले. त्यावर मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले. संजय गायकवाड यांनी ‘पीआय’ दराडे याच्या संपत्तीची चौकशीची मागणी केली. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संपत्तीची चौकशी केली जाईल अशी घोषणा मंत्र्यांनी केली.
कोल्हे हत्त्याकांडाकडे लक्ष वेधले
रवी राणा यांनी उमेश कोल्हे हत्त्याकांडाकडे लक्ष वेधले. तत्कालीन एसपी आरती सिंग यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी दरोड्याचे प्रकरण म्हणून तपास करीत वेळकाढूपणा केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून तपास दरोडा म्हणून करण्यात आल्याचा आरोप राणा यांनी केला. सबब या संपूर्ण प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली. हा लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे. या संपूर्ण प्रकरणाचा राज्य गुप्तचर आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मुद्देनिहाय 15 दिवसात मागवून उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या जाईल असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
1,971 total views, 6 views today