
पुणे- भाजपचे सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा क्षेत्राचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. दरम्यान, आमदार गोरे यांना सुदैवाने जास्त दुखापत झाली नसल्याचा निर्वाळा रुबी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलाय. ते शुद्धीवर असून बोलत देखील आहेत. त्यांचे पल्स आणि रक्तदाब व्यवस्थित असून त्यांच्या छातीला थोडासा मार लागला आहे, असे रूबी हॉस्पिटलचे डॉ. कपिल झिरपे यांनी सांगितले. फलटणजवळ हा अपघात झाल्याचे (BJP MLA Jaykumar Gore Accident) सूत्रांनी सांगितले. आ
मदार गोरे हे पुण्याहून त्यांच्या दहिवडी या गावी जात असताना हा अपघात झाला. त्यांचे फॉर्च्यूनर वाहन फलटण येथील बानगंगा नदीच्या पुलावरून जाताना काळोखात ते सुमारे ३० फूट ऊंच असलेल्या पुलावरून खाली कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावर लावण्यात आलेल्या तारा तोडून खाली कोसळली. वाहनामध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. आमदार गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाहनात असणारे त्यांचे स्वीय सहायक रुपेश साळुंखे, चालक कैलास दडस यांना बारामतीमध्ये तर सुरक्षा रक्षक जनार्दन बनसोडे यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयास भेट दिली. तर आमदार राहुल कुल रुग्णालयात पोहोचले आहेत. गोरे यांच्या अपघातातनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली आहे. तर अनेकजण अपघातस्थळी पोहोचले आहेत.
पहाटेचा प्रवास टाळा
दरम्यान, पहाटेच्या वेळी अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पहाटेच्या वेळी प्रवास टाळण्याचा सल्ला वारंवार दिला जात असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वी, आमदार विनायक मेटे यांच्या वाहनाला देखील पहाटेच्या सुमारास अपघात झाला होता.
799 total views, 3 views today