
डाॅ.प्रतिमा इंगोले यांना त्यांच्या काव्य क्षेत्रातील योगदानबद्दल नुकताच काव्ययोगिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा डाॅ प्रतिमा इंगोले यांना मिळालेला एकशे अकरावा पुरस्कार आहे.त्यांचे आत्तापर्यंत पाच कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांचा महत्त्वाचा काव्य संग्रह “भुलाई”(१९९७) आहे.हा बहिणाबाईंची गाणी नंतर कवयित्रीने लिहिलेला बोलीतील पहिला काव्य संग्रह आहे. भुलाई काव्यसंग्रहामुळे लोकभाषेला संरक्षण मिळाले आहे, असे माजी कुलगुरू पद्मश्री डाॅ वि.भि कोलते म्हणतात. तर भुलाईमुळे वर्हाडी बोलीला व पर्यायाने मराठीला आगळी श्रीमंती मिळाली आहे असे कुसुमाग्रज म्हणतात.भुलाई हा बोलीतील शब्द आहे.भुलाई म्हणजे बाहुली अथवा मुलगी.त्यांचा दुसरा काव्य संग्रह “उदयसोहळा” (२००५) सामाजिक कवितांचा संग्रह असला तरी त्यामुळे “उदयसोहळा” हा नवा शब्द त्यांनी मराठीला बहाल केला आहे. यातील “पुन्हा एकदा” कविता नववीला अभ्यासक्रमात आहे.तिसरा” “उदक्कार” (२००९)आर्त आळवणी करणारा काव्य संग्रह स्त्री वादी संग्रह असून त्यासंग्रहामुळेही “उदक्कार” हा नवा शब्द मराठीला बहाल केला आहे. “शेतकर्याच्या नारी” (२००७)आणि “सातबारा” (२०२२)हे संग्रह शेतकरी स्त्री च्या जगण्याचा व असण्याचा वेध घेणारे काव्यसंग्रह आहेत. तर “शेतकरी व्यथा” व “लळा” हे चारोळीसंग्रह शेतकर्याचे व बालकांचे भावविश्व चित्रीत करतात.”नवी बडबडगीते” पण असेच नवे गाणे शिकवणारा संग्रह आहे.”सोन्याचं बाळ” व “लाजाळू” त्यांचे बालकविता संग्रह आहेत. श्यामवेल, श्यामतुरा,श्यामगाणे, शुरांचा हा देश आमुचा, सोनपीस ही त्यांनी संपादित केलेली कवितांची पुस्तके आहेत. “बाईची कहाणी” दीर्घ कवितांचे पुस्तक आहे. त्यांना आत्तापर्यंत सात राज्य पुरस्कार मिळाले आहेत.तर अनेक बोलीतील दुर्मिळ शब्द त्यांनी मराठीला प्रदान केले आहेत.हे त्यांचे खचितच महत्त्वाचे व भक्कम असे मराठीला योगदान आहे.
1,054 total views, 3 views today