
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी विरोधपक्षाने सरकारविरोधात टाळ कुटो व दिंडी आंदोलन करीत सत्ताधारी सरकारचा धिक्कार केला. भूखंड घ्या.. कुणी गायरान घ्या.. खोक्यानं घ्या.. कुणी खोऱ्यानं घ्या.., कुणी गुवाहाटीला जा कुणी सुरतला जा.. असे भजन गात सत्ताधारी पक्षाविरोधात सूर आवळला.
विधिमंडळ अधिवेशनाचा कालचा दिवस सीमावाद प्रश्न, भूखंड घोटाळा आणि सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीवरून विरोधक-सत्ताधाऱ्यांच्या तू तू – मै मै ने गाजला. तर, आज सकाळी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर अभंग गात आंदोलन केले. भूखंड घोटाळ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, संजय राठोड यांच्या नावाने शिमगा करीत त्यांचा निषेध केला. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळील काँग्रेस कार्यालयाजवळून फुगड्या घालत, रिंगण करीत व अभंग गात या निषेध मोर्चाला सुरुवात झाली. सर्व आमदारांनी डोक्यात पांढऱ्या टोप्या परिधान करून गळ्यात टाळ लटकवून वाजवत विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ येऊन आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मोदी का नाम जपना, पराया माल अपना, लवकर लुटा तुम्ही लवकर लुटा, महाराष्ट्राला लुटा तुम्ही जनतेला लुटा, गुवाहाटीला चला तुम्ही सुरतेला चला, खोके घ्यायला चला.. अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाला विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रोहित पवार, आदित्य ठाकरे, यशोमती ठाकूर, नाना पटोले, अमोल मिटकरी, भास्कर जाधव, प्राजक्त तनपुरे आदिंचा सहभाग होता.
237 total views, 3 views today