
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची बुधवारी दुपारनंतर आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली. तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी देशमुख कारागृहाबाहेर आले. देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. याशिवाय विरोधी पक्ष नेते अजित पवार, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक वरीष्ठ नेते देशमुख यांच्या स्वागतासाठी कारागृहाबाहेर उभे होते. देशमुख यांचे स्वागत केल्यावर या नेत्यांनी त्यांना पेढा भरविला. देशमुख यांनी जीपवर चढून उपस्थित कायकर्त्यांना अभिवादन स्वीकारले व त्यांचे आभार मानले. यावेळी देशमुख यांच्या कुटुंबातील मंडळीही उपस्थित होती. आपला न्यायदेवतेवर विश्वास असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. सुटकेनंतर देशमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असले तरी त्यात देशमुख हे सहभागी होण्याची शक्यता नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नागपुरात सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र, अधिवेशनातून सवड काढून विरोधी पक्ष नेते अजित पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक नेते मुंबईला देशमुख यांच्या स्वागतासाठी रवाना झाले. अजित पवार यांना बुधवारी सकाळी आयोजित कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसाठी हजर रहायचे होते. पवार यांनी बैठकीस उपस्थिती लावण्यास असमर्थता दर्शविल्यावर त्यांना राज्य सरकारचे विमान वापरण्याची मुभा देण्यात आली व त्या विमानाने ते मुंबईला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीबीआय प्रकरणात एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला होता. या प्रकरणात १०० कोटी वसुलीचे खोटो आरोप देशमुखांवर केल्याचा युक्तीवाद देशमुख यांच्या वकिलांनी केला होता. देशमुख यांच्या नागपूर येथील घराबाहेरही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
1,862 total views, 3 views today