
नागपूर. गत सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना फसविण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला होता. आमच्यासकट काही लोकांच्या चौकश्याही लावण्याचीही तयारी केली गेली होती, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आज विधीनसभेत केला. ही सत्तेची मस्ती नव्हती का, असा पलटवारही त्यांनी केला.
अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. विरोधकांनी केलेले सर्वच आरोप त्यांनी खोडून काढले. प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या रडारवर असल्याचे दिसले. शिंदे म्हणाले की, मंत्र्यांवर चुकीचे आरोप करून राजिनामा मागितला गेला. सभागृहात कमी आणि रोजच बाहेर आंदोलन करून बदनामीचा प्रयत्न झाला. दाऊदसोबत संबंधाच्या कारणावरून त्यांचा मंत्री जेलमध्ये गेला, दोन मंत्री जेलमध्ये असूनही त्यांचे राजिनामे घेतले नाही. आता कायदा व सुव्यवस्थेवर तेच बोलत आहेत. आमच्यावर चौकश्या लावण्याची तयारी झाली होती. पण, आम्ही सत्ताच बदलली. त्यांना संधीच दिली नाही, असा टोला त्यांनी लगावला.
त्यांना हात दाखविला, ज्योतिष्याची गरज नाही
सत्ता स्थापन झाल्यापासूनच दरवेळी सरकार पडेल, असे ते सांगतात. आम्ही त्यांना हात दाखविला. आता ज्योतिषाकडेही जाण्याची गरज नसल्याचे सांगत ठाकरे गटाकडून होणाऱ्या आरोपांना शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. बाप चोरला, पक्ष चोरल्याचा ते आरोप करतात. पण, या पुढेही झेंडा आणि अजेंडा आमचाच असेल आणि बहुमताने निवडूनही येऊ असे सांगत त्यांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ‘मै खामोश हू क्योंकी मै सब जानता हू’, ‘बात निकलेगी तो बहोत दूर तक जायेंगी’ अशा शायराना अंदाजमध्येही त्यांनी विरोधकांना इशारा दिला.
459 total views, 3 views today