
कोरेगाव-भीमाला जाणे टाळले ; कारणही केले स्पष्ट
पुणे. राज्याचे मंत्री व भाजप नेते चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil ) यांनी कोरेगाव-भीमा (Koregaon-Bhima ) येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाण्याचा कार्यक्रम रद्द केला आहे. याठिकाणी आल्यास तुमच्यावर पुन्हा शाई फेकू, असा इशारा (warning to throw ink again ) चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी घरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. काही दिवसांपूर्वीच चंद्रकात पाटील यांचे एक आक्षेपार्ह विधान चांगलेच गाजले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याने पिंपरी-चिंचवड येथे असताना चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली होती. पाटील आज विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे जातील, असा अंदाज होता. परंतु, पुन्हा शाईफेकीचा इशारा मिळाल्याने त्यांनी कोरेगाव-भीमा येथे जाणे टाळले. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून आपली बाजू स्पष्ट केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार म्हटले आहे की, वंचितांच्या शैक्षणिक विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मी दोनवेळा दिलगिरी व्यक्त करुनही माझ्या विधानाचा विपर्यास सरुन माझ्यावर भ्याडपणे शाईफेक झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणणाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तुडवली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती, आताही मी भीमा कोरेगाव ला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनास आलो तर पुन्हा शाई फेकू म्हणून धमकी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे, परंतु हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमा कोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये, अशा एखाद्या घटनेमुळे गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची सुप्त इच्छा आहे. मोठ्या प्रमाणात माझ्या माता, भगिनी, वयस्कर मंडळी, लेकरं श्रद्धेने आली असतील. येत असतील तर त्यांची श्रद्धा व सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत. त्यामुळे मी माझ्या घरी आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून विजयस्तंभास मानवंदना देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक ०१ जानेवारी १९२७ रोजी आपल्या अनुयायांसह, भीमा कोरेगाव येथे शौर्याचे प्रतीक असलेल्या मानवंदना दिली होती. तेव्हापासून हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात .बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझ्या मनात प्रचंड श्रद्धा आहे. तिथे जाहीर प्रदर्शन करणे हा माझा स्वभाव नाही. सन १९८२ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने रत्नागिरीचे पतीतपावन मंदिर ते दादरच्या चैत्यभूमीपर्यंत एक महिनाभर चाललेल्या समता यात्रेचे नेतृत्व मी केलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं यासाठी शेकडो गावांमध्ये केलेल्या संवाद यात्रेचे नेतृत्वही मी केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घराघरात साजरी व्हावी व नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचावेत म्हणून प्रत्यक्ष प्रयत्न केले, असेही चंद्रकांत पाटील यांनी पत्रकात नमूद केले आहे.
389 total views, 3 views today