
-पुरुषोत्तम आवारे पाटील
विदर्भात ( vidhrbh ) सरलेल्या वर्षात ग्राम संसदेवर नवे सरकार आरूढ झाले आहे. जनतेने त्यांना वर्षाच्या शेवटी जरी कौल दिला असला तरी खरा कारभार नवीन वर्षात सुरु झाला आहे. अकोला जिल्ह्यातही अडीचशेवर गावात नव्या लोकांनी पंचायत भवनात प्रवेश केला आहे. निवडणूक काळात किंवा प्रचाराच्या दरम्यान जी काही कटुता निर्माण झाली असेल ,कुणी कुणाला पाडले ,कुणामुळे आपले नुकसान झाले हे सगळे विसरून आता गावाच्या विकासावर लक्ष केंद्रित करून नव्या वर्षात नव्या संकल्पना गावात अन आपल्या स्वभावातही रुजविण्याची गरज आहे. हे लक्षात घ्या राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. आज ज्यांनी तुमच्या विरोधात प्रचार केला किंवा विरोध केला कदाचित उद्या तेच तुमच्या सोबत असतील आणि आजचे मित्र तुमच्या विरोधात असतील. या चढउतारालाच राजकारण म्हटले जाते म्हणून राजकीय विरोधकांना कधीही व्यक्तिगत शत्रू समजण्याची चूक करू नका.
थेट सरपंच आणि पंच आता ग्राम पंचायत मध्ये स्थिरावले असतील तर आगामी काळात लोकांना दिलेली आश्वासने कशी पूर्ण करता येतील याचे नियोजन करा. निवडून येण्यासाठी आश्वासने तर भरपूर दिली मात्र आता खिश्यात किंवा ग्राम पंचायत फंडात काही नाही हे समजल्यावर अजिबात खचुन जाऊ नका. गावासाठी काहीतरी करण्याची तुमची इच्छाशक्ती असेल आणि त्यासाठी मेहनत करण्याची तयारी असेल तर भरपूर मार्ग तुमच्यासाठी खुले होऊ शकतात. त्यासाठी गावातील विकासविषयक दृष्टी असलेल्या काही लोकांचा सल्ला घ्या, ज्याने उत्तम कारभार केला असा माजी सरपंच जो तुमच्या विरोधी गटातला असेल तरी त्याचेही मार्गदर्शन घेण्यात कमीपणा समजू नका. गावाच्या भल्यासाठी तुम्ही व्यक्तिगत मानापमान विसरू शकता हा संदेश गावात जाऊ द्या. निवडणूक आटोपली त्यामुळे आता सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांशी उत्तम संबंध ठेवा,नसल्यास निर्माण करा.
ग्राम पंचायत निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसतात त्यामुळे तुम्ही जोवर तिथे आहात तोवर कोणत्याही पक्षात सक्रिय न राहता सगळ्यांची गावाच्या विकासाला कशी मदत घेता येईल हाच विचार सतत डोक्यात ठेवायला शिका. सगळ्या सदस्यांना विश्वासात घेऊन निधी देणाऱ्या लोकांना भेटा ,आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास त्यांना द्या. जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य ,आमदार ,विधान परिषद सदस्य ,खासदार यांच्या सतत संपर्कात राहून गाव त्यांच्या पाठीशी असल्याचा त्यांना भरोसा द्या. सरपंच म्हणून तुम्ही दर पंधरा दिवसांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयात एखादी चक्कर मारलीच पाहिजे. जिल्हा नियोजन समितीवर तुमच्या नजीकचे जे कुणी सदस्य असतील त्यांच्याही संपर्कात राहून गावात प्राधान्याने करावयाच्या विकास कामांची यादी किंवा ठराव त्यांना दिले पाहिजेत.
गावातील कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे कुण्या मंत्र्यांशी थेट संबंध असतील तर त्याचा योग्य सन्मान राखत मंत्रालयात जाऊन त्या मंत्र्याच्या खात्याचा विशेष निधी गावात तुम्ही आणू शकता. रोजगार हमी किंवा ग्रामविकास खात्याला गावात थेट निधी देता येतो त्यामुळे तो आपल्या गावात कसा आणता येईल याचेही नियोजन करता येते.राज्य शासनाच्या एकूण १४४० योजना आहेत ज्यातून तुम्हाला निधी मिळू शकतो.राज्य वित्त आयोग,महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना,स्वच्छता अभियान,घरकुल योजना,सर्वशिक्षण अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान,राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान,जिल्हा परिषद निधी,आपले सरकार केंद्र निधी,अनुसूचित जाती-जमाती निधी,ठक्कर बाप्पा योजना,पंतप्रधान विकास योजना यातून गावाला मोठ्या प्रमाणावर निधी मिळू शकतो त्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांना सतत भेटणे आवश्यक त्या नमुन्यात विकासाचे प्रस्ताव सादर करणे, अशा व्यक्तींना ग्राम पंचायत भवनात बोलावून त्यांचा उचित सन्मान करणे याची गरज आहे.
राजकारण असो की सार्वजनिक जीवन त्यात नेहमी बोलणाऱ्यांची चलती असते,मुक्यांना कुणीही विचारत नाही म्हणून गावाच्या विकासाला जे जे हवे त्यासाठी सतत लोकांशी बोल्ट राहिले पाहिजे. ज्यांच्या हाती निधी देण्याची क्षमता असेल अशा व्यक्तीना सतत गावात कोणत्याही कारणाने निमंत्रित करून सगळी कार्यकारिणी विकासाच्या बाबत कशी एकजूट आहे याचे सतत दर्शन घडवत राहायला हवे. ज्या सरपंचाकडे विकासाची दूरदृष्टी नसेल त्याने त्या क्षेत्रातील समजदार व्यक्तीची मदत घेताना कमीपणा समजू नये. सगळेच काही परिपूर्ण नसतात ,अनुभवाने अनेक गोष्टी शिकता येतात याची जाणीव ठेवून उत्तम नियोजन केले तर अविकसित गावाला सुद्धा आगामी दोन वर्षाच्या काळात उत्तम विकास साधता येतो. सरपंच अन पंच मित्रानो,चला तर मग लागा कामाला. गावासाठी ,विकासासाठी मतभेद आणि विविध पक्षाचे जोडे बाहेर काढून एकत्र या …
617 total views, 3 views today