
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख
मुंबई – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्यचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यात कक्षाकडून 2600 रुग्णांना एकूण 19 कोटी 43 लाख रुपयांची मदत दिली आहे (Chief Minister Medical Help Desk). मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून रुग्णसेवेत झोकून दिले आहे. त्यामुळेच पहिल्याच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाखाची तर डिसेंबर महिन्यात विक्रमी 8 कोटी 52 लाख रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्यात रुग्णांना देण्यात आलेल्या विक्रमी मदतीबाबत बोलतांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे.
1,789 total views, 6 views today