
बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनजंय मुंडे यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला असून त्यांच्या छातीला मार लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. धनजंय मुंडे यांनी स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली असून डॉक्टरांनी आपल्याला विश्रांतीचा सल्ला दिला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला. मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून मुंडे परळीकडे परत येत असताना परळीतच वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाला. ((Dhananjay Munde Accident) या अपघातात मुंडे यांच्या कारच्या पुढच्या काही भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याचे आढळून आले आहे. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून कदाचित त्यांना बुधवारी दुपारी लातूरहून मुंबईला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येईल, असे अंदाज आहेत.
विरोधी पक्ष नेते राहिलेल्या धनंजय मुंडे यांना गेल्यावर्षी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. तेव्हा धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांची प्रकृती सुधारली व ते लगेच सक्रीय देखील झाले होते. मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, प्रकृतीसंदर्भातील अफवांवर कुठलाही विश्वास ठेवू नये, असे आवाहनही मुंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास परळी पोलिसांकडून सुरु आहे. सध्यातरी वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती पुढे येत आहे.
289 total views, 3 views today