
स्थानिक राजाबाक्षा येथील पं. बच्छराज व्यास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे आयोजित नृत्य व कौतुकसमारंभात ‘संस्कार भारती’च्या अध्यक्षा माननीय कांचनताई गडकरी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करतांना म्हणाल्या की “शाळेने दिलेली संस्काराची शिदोरी विद्यार्थ्यांनी विसरू नये. जगात कुठेही गेलात तरी त्या शिदोरीचा वापर देशाच्या प्रगतीसाठी करावा.” प्रस्तूत कार्यक्रमास राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका आदरणीय शांताक्का विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणातून आशीर्वाद दिलेत.
शाळेची माजी विद्यार्थिनी आणि डॉ.रवीन्द्र व रोहिणी कोमजवार यांची सुविद्य कन्या डॉ.शर्वरी कोमजवार हिचा भरतनाट्यम् नृत्याविष्कार व कौतुकसोहळ्याचे आयोजन शाळेने मंगळवारी रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात केले होते. डॉ.शर्वरीने संगणकीय विज्ञान शाखेतील ‘एम.एस.’ आणि डॉक्टरेट पदवी अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटीतून प्राप्त केली. या शिक्षणासोबतच तिने नृत्यगुरू डॉ.श्रीधरा अक्किहेब्बालू यांचेकडून भरतनाट्यमचे धडे घेतले. नृत्य प्रवीण झाल्यावर अमेरिकेत तिचे कार्यक्रमही झाले. सध्या डॉ.शर्वरी भारतात आली असून महाकवी कालिदासांच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ वरील नृत्यप्रयोगाच्या तयारीसाठी बंगलुरूला जाणार आहे. जाण्यापूर्वी तिने आपल्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शाळाव्यवस्थापनानेही तिच्या कार्याची दखल घेत तिचे नृत्यप्रदर्शन आयोजित केले. भरतनाट्यम् सादर करताना शर्वरीने पुष्पांजली, सरस्वती कीर्तन, दत्तात्रेय स्तोत्रम, नाट्यपद व कवी जयदेवांची अष्टपदी सादर करून आपल्या नृत्यकौशल्याची चुणूक दाखवली. ‘तिल्लाना’ ने नृत्याची सांगता केली. नृत्याविष्काराचे निवेदन श्री रमेशचंद्र दीक्षित यांनी केले.
मंचवर मा. सौ. कांचन गडकरी, आ.शांताक्का यांचेसह भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री संजयजी शिरपुरकर, कार्यवाह अॕड. उपेन्द्र जोशी, मुख्याध्यापिका सौ.अर्चना जोशी व सत्कारमूर्ती डॉ.शर्वरी कोमजवार विराजमान होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संजयजी शिरपुरकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. शुभांगी चिंचाळकर यांनी सांभाळले. मुख्याध्यापिका सौ. अर्चना जोशी यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
233 total views, 3 views today