
मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यातील वाकयुद्ध आता विकोपाला गेले आहे. अजित पवार यांनी नितेश राणे यांच्यासाठी ‘टिल्ल्या’ असा शब्दप्रयोग करून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतापलेल्या नितेश राणे यांनी त्यांना ‘धरणवीर’ असे संबोधून प्रत्युत्तर दिले (Ajit Pawar vs Nitesh Rane) आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत की धर्मवीर आहेत, यावरुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या जोरदार वाद सुरु आहे. त्यावरून राणे यांनी पवारांवर टीका केली हे विशेष. अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीवर भाजप आमदार नितेश राणे संतापले. नितेश राणे यांनी याबाबत ट्वीट करुन अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीला उत्तर दिले आहे. लघुशंकेने धरणाची उंची वाढवणारे ‘धरणवीर’ यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरुन भाष्य केले. यावरुनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची’ टीका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही, असे नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. अजित पवार यांनी नितेश राणे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत वार केला. टिल्ल्या लोकांनी असले काही सांगायचे कारण नाही. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझ्या पक्षाचे बाकीचे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. मी असल्यांच्या नादी लागत नसतो, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
231 total views, 3 views today