
नवीन आधूनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करुन त्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रयत्न स्तुत्य असून शेतकऱ्याच्या हितावह आहे. यासोबतच केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या एकात्मिक शेती प्रकल्पाला शेतकऱ्यांनी भेट देवून शेती उत्पनात वाढ करावी, असा सल्ला केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक वाय. जी. प्रसाद यांनी शेतकऱ्यांना दिला. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पद्व्युत्तर वसतिगृह परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाच्या उदघाटनपर भाषणात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते . एकात्मिक शेती प्रकल्पास शेतकऱ्यांनी भेट देवून तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी. त्याचा उपयोग शेती उत्पादनासाठी घ्यावा. त्याबरोबर केंद्राच्या बकरी फार्मला भेट देवून शेतीपूरक व्यवसाय करावा, असे श्री. प्रसाद यांनी सांगितले. युवकांनी प्रशिक्षण घेवून आधूनिक शेतीकडे वळावे. संस्थेतर्फे दरवर्षी 200 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येत असून अनुसूचित जाती व जमाती यांना प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व शेळी पालन व रेशिम उद्योगासारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे,असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना कालखंडानंतर प्रथमच आयोजित कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यामुळे आत्माच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळेल, असे म्हापसूचे संचालक ए.यु. भिकाने यांनी सांगितले. आधुनिक शेती व पशुसंवर्धनाच्या योजनांची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. आधूनिक तंत्रज्ञानाच्या वापराने विदर्भातील शेती विकसित होईल व त्यांना बाजारमुल्य मिळेल. शाश्वत शेतीसाठी बाजारपेठ व विपणन व्यवस्था महत्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.
303 total views, 6 views today