
पुणे : पुणे जिल्ह्यात आळंदीमध्ये काही जणांचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली (Religious Conversion Case in Alandi) आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार सुधाकर सूर्यवंशी याच्यासह तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवून त्यांना ख्रिश्चन धर्मात येण्याचे आमीष दाखविण्यात आल्याची तक्रार होती. या तक्रारीची शहानिशा केल्यावर आळंदी पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणातील तक्रारदार स्मशानभूमीत काम करणारे लोक आहेत. या लोकांना आमिषे दाखविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक स्मशानभूमीत काम करणाऱ्या मातंग समाजाच्या लोकांकडे आले. त्यांनी तुमचे सगळे आजार ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेने बरे करतो, असे दावे केले. तुमच्या जीवनातील आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी घरातील देवदेवता टाकून द्या व येशू ख्रिस्तांची पूजा करा, असा आग्रह त्यांच्याकडून केला जात होता. हे सांगताना धर्मप्रसारक लोकांनी येशूचे रक्त म्हणून अनेकांना द्राक्षाचे पाणी पाजण्याचा प्रकारही केला. मात्र, यामागील खरा उद्देश लक्षात आल्यावर मातंग समाजाच्या लोकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करून गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या लोकांमध्ये सुधाकर सुर्यवंशी व त्याच्या काही साथीदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या एकूणच प्रकारावर मातंग समाजातील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
376 total views, 6 views today