
रस्त्याची अवस्था बघून संताप अनावर
नागपूर. हिंगणा मार्गावर जागोजागी रस्ता बांधकाम सुरू आहे. कित्येक दिवसांपासून कामाची गती अतिशय मंद आहे. जागोजागी रस्ता खोदण्यात आला असून तो पूर्ववत करायलाच वर्षानुवर्षे लागतात का? नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे खडे बोल आमार समीर मेघे (Sameer Meghe) यांनी अधिकारी व कंत्राटदाराला सुनावले. गेल्या वर्षभरापासून हिंगणा मार्गाचे सिमेंटीकरणाचे काम मंदगतीने सुरू आहे. यावेळी भाजप (BJP) डिगडोह मंडळाचे अध्यक्ष सुरेश काळबांडे यांनी आमदार समीर मेघे यांच्या लक्षात हिंगणा मार्गावरील रस्ता बांधकामाची परिस्थिती आणून दिली. त्यांना हिंगणा मार्गावर पाचारण करून त्यांना याबाबत अवगत केले. आमदार मेघे यांनी परिस्थितीचे अवलोकन करून अधिकाऱ्यांना यावेळी परिस्थितीची जाणीव करून दिली. रस्त्याचे बांधकाम अजूनही पूर्ण झालेले नसून सर्वसामान्य माणूस, वाहनधारक, शाळांचे व महाविद्यालयाच्या विद्यार्थी (Students) यापासून फारच त्रस्त आहे. या मार्गावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागते.
गेल्या सात-आठ महिन्यापासून रस्त्याकाठचा व्यापार ठप्प झालेला आहे. ऐन दिवाळीतही व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला फटका बसला. असे असताना जनतेच्या या अडचणीकडे लक्ष द्यायला कोणीच तयार नाही. आमदार मेघेंपुढे नागरिकांनी रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला. याप्रसंगी डिगडोह भाजप मंडळाचे अध्यक्ष सुरेश काळबांडे, डिगडोह प्राधिकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, माजी सरपंच दामोदरराव सांगोले, मेडिकल असोसिएशनचे बबनराव पडोळे, बाळासाहेब वाघमारे, दिवाकर दळवी, संजय वानखेडे, प्रदीप रोडे, काशीनाथ मापारी, व्यापारी संघटनेचे रवी जैन आदी उपस्थित होते.
रस्ता बांधकाम तातडीने सुरू करून पूर्ण करावे. या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला प्रचंड त्रास आहे. अपघाताची शक्यता नेहमीच असते. व्यापाऱ्यांची व्यवसाय उद्वस्त झालेला आहे. जर हे काम लवकर पूर्ण झाले नाहीतर आम्ही सर्व व्यापारी तीव्र आंदोलन करू, असा इशारा मेडिकल असोसिएशनचे बबनराव पडोळे यांनी दिला.
199 total views, 6 views today