
नागपूर : विज्ञानाचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा आज समारोप झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने या विज्ञान काँग्रेसचे यजमान पद भूषविले. विज्ञानप्रेमींचा उत्सफूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. नोबेल पुरस्कारप्राप्त प्रा. ॲडा योनाथ यांची उपस्थिती व व्याख्यान यावेळी विशेष लक्षवेधी ठरली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने या विज्ञान काँग्रेसचे उदघाटन करण्यात आले.
विज्ञानप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या परिषदेत एकूण 27 परिसंवादांचे आयोजन करण्यात आले. भारताची 2030 मधील वाटचाल,अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान, कोविड आजारानंतर दिसून येणारे परिणाम, कर्करोग, पुरुष प्रजनन संदर्भातील संशोधन यासह विविध विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ‘निरी’चे माजी संचालक डॉ.सतीश वाटे यांच्या हस्ते झाले.
भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले. होते. शहीद बिरसा मुंडा सभागृहात आदिवासी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांच्या हस्ते झाले. आदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा, असा या आदिवासी, शेतकरी,विज्ञान काँग्रेसमधील सूर होता.
प्राईड इंडिया एक्सपो हे या प्रदर्शनातील विशेष आकर्षण ठरले.
901 total views, 3 views today