
नागपूर. ढगाळ वातावरणानंतर आकाश नरभ्र होताच विदर्भातील (Vidharbha) तापमानात सातत्याने घट होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे सुटीचा दिवस असल्याने रविवारी अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. नागपुरात (Nagpur) पारा 8 अंश सेल्सिअस नोंदविला गेला असून यंदाच्या मोसमातील रविवार हा सर्वात गार दिवस ठरला. पुढील पाच दिवस पूर्व उत्तर विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा (Cold wave warning in Vidarbha) हवामान खात्यासह अभ्यासकांनी दिला आहे. अवघ्या 24 तासात किमान तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. उपराजधानीत आठ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून गोंदियात सर्वाधिक कमी 6.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर विदर्भातील जवळजवळ सर्वच शहरात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमालय क्षेत्रात बर्फवृष्टी होणार आहे. तसेच सध्या वाऱ्याची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. दक्षिण बंगालच्या खाडीत चक्री वारे सक्रिय आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस मध्यप्रदेश आणि उत्तर पूर्व विदर्भात थंडीची लाट राहील. तर उर्वरित महाराष्ट्रात तापमान कमी होईल, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. गोंदिया आणि नागपूर पाठोपाठ वर्धा व गडचिरोली शहरात 9.4 तर ब्रम्हपुरी येथे 9.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. सर्वाधिक तापणाऱ्या चंद्रपूर शहरात देखील किमान तापमान 10.2 अंश सेल्सिअस आहे. त्यापाठोपाठ अमरावती 10.4, यवतमाळ 10.7, अकोला 11 तर बुलडाणा येथे 11.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा प्रत्यक्षात उतरणार असून फेब्रुवारी महिन्यात देखील थंडी कायम राहील असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे. गारठा वाढत असल्याने दमा, अस्थम्याचे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहाम मुलांची काळजी घेणे आवश्यक झाले आहे.
Shankhnaad News | Ep: 69 वेजिटेबल थाई ग्रीन करी आणि काजुन चिकन
885 total views, 3 views today