
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ जानेवारीला प्रथमच मुंबईत येत असून ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे लोकार्पण होण्याची शक्यता व्यक्त (PM Narendra Modi to Visit Mumbai) होत आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यात भाजप व शिंदे गटाचे निवडक नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या संदर्भातील तयारीवर चर्चा होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला मोठे महत्त्व आले आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर पंतप्रधान मोदी हे प्रथमच मुंबईत येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरु आहे. येत्या एक ते दोन दिवसात याबाबत माहिती दिली जाणार आहे. मुंबईतील अनेक विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. त्यात मेट्रो प्रकल्पाचा समावेश होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. या कार्यक्रमांची रुपरेषा देखील सरकार पातळीवर निश्चित करण्यात येत आहे. यानिमित्ताने बीकेसीवर मोठा मेळावा आयोजित होऊ शकतो, असेही संकेत आहेत. लवकरच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका आहे. या निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याला महत्व आले आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप व शिंदे गटातील समन्वयासाठी आज रात्री या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.
228 total views, 3 views today